नको हा कोरोना…नको हे लॉकडाऊन

0
कोरोनाच्या तिसरी लाट आली आणि आम्हा शिक्षक व विद्यार्थ्यांची प्रचंड निराशा झाली आहे. पहिली व दुसरी लाट आली आणि विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील अध्ययन व अध्यापनाची दरी निर्माण करून गेली. साधारपणे दोन लाटात दोन पिढ्यांचे प्रचंड प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले, जे कधीही भरून निघणार नाही…तरीही कोरोना मध्यंतरी ओसरल्यावर एक नवी आशा निर्माण झाली. मुले शाळेत यायला लागली होती. अध्ययन व अध्यापन छान सुरू झाले होते. मस्त शैक्षणिक वातावरण निर्माण झाले होते. दोन वर्षांनी विद्यार्थी व शिक्षक भेटले होते. मनसोक्तपणे संवाद साधत होते. मनातील सर्वकाही शंका विचारून एक वेगळा आनंद घेत होते. ऑनलाईन नको होतेच म्हणून सर्व खूश झाले होते, पण तोच तिसरी लाट येणार अशी चर्चा सुरू झाली…आम्हाला व आमच्या विद्यार्थ्यांना मात्र अशा चर्चेचा खूपच त्रास होत होता, असे पुन्हा होऊ नये. कोरोनाच येऊ नये, कायमचा लांब जावा व उत्तम प्रकारे शिक्षण पूर्ण करण्यासाठी वेळ यावी असेच नेहमी वाटत असे.
                पण, पुन्हा तिसरी लाट आली आणि सोमवारपासून आम्हा गुरू-शिष्यांना दूर करून गेली.
                खरं तर सर्वांनी काळजी घेतली असती, सर्व नियम पाळले असते, तर पुन्हा असे संकट ओढवले नसते व पुनः मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, ते झाले नसते. लोकांना धोका कळतो, मात्र कसे वागावे हेच कदाचित वळत नसेल. आपल्या विचित्र वागण्यामुळे किती पिढ्यांचे नुकसान झाले व होत आहे याचा तरी सारासार विचार करण्याची गरज आहे. तीन वर्ष वयाचा विद्यार्थी दोन वर्षे कोरोनामुळे डायरेक्ट पहिलीत, चौथी पास झालेला हायस्कूलमध्ये जाणार, अशी गोड स्वप्न पाहणारा डायरेक्ट सहावीत आला. पाचव्या इयत्तेत काय अभ्यासक्रम असतो त्याला कळलेच नाही.
             आठवीचा डायरेक्ट दहावीत व दहावीचा डायरेक्ट बारावीत आला. काय होणार पुढे या चिमुकल्या जीवांचे, कसे तरणार स्पर्धेत बिचारे, असा विचार करण्याची वेळ आली. तरीही लोक मात्र अजूनही नियम धाब्यावर बसवून कोरोनाला आमंत्रण देत आहेत.
खर सांगायचं तर या दोन वर्षात मुलांना शाळा महाविद्यालयात मिळणारे, मूल्यशिक्षण मिळाले नाही. अनेक स्पर्धा आयोजित करण्याचा विचार असूनही करता येत नाहीत.  प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे.
                  आम्हा सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांच्यावतीने सर्वांना आवाहन करतो, की सर्वांनी मिळून नियम पाळावेत व पुन्हा एकदा कोरोनाला कायमस्वरूपी हरवून शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोकळे वातावरण निर्माण करावे.

 दिलीप अहिरे, शालेय शिक्षक, नाशिक 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.