नाशिक, (वा.)
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी दलितांच्या उध्दारासाठी व भूमिहीन लोकांसाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. प्रत्येकाने त्यांचे राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे, असे प्रतिपादन सचिव पी. के. गायकवाड यांनी केले.
शालिमार येथील नेहरू गार्डनजवळील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृहात संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा स्मृतिदिनी कार्यक्रम झाला. याप्रसंगी गायकवाड बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्वनाथ काळे होते.
यावेळी भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
गायकवाड म्हणाले की, पद्मश्री गायकवाड हे थोर समाजसेवक होते. काळाराम मंदिराच्या प्रवेशासाठी व महाड येथील चवदार तळ्याच्या मुक्तीसाठी केलेल्या आंदोलनात ते अग्रभागी होते. नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक संस्थांचे अध्यक्ष, सदस्य म्हणून त्यांनी आदर्शवत कार्य केले.
यावेळी विशाखा कसबे, विजयराज पगारे, धीरज सावकार, प्रशांत बागुल, उमेश कटारे, अधिक्षिका बेबी डेर्ले, सोनिका गायकवाड, रंजना देवरे, वैशाली नाठे, तसेच सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. अधिक्षिका बेबी डेर्ले यांनी सूत्रसंचालन केले. सुरेखा पवार यांनी आभार मानले.
—