कोरोनानंतर सुमारे दीड ते पावणे दोन वर्षांनी शाळा सुरू झाली आणि आनंद वाटला. वयाच्या 53 व्या वर्षापर्यंत शासनाने दिलेल्या सुट्टीशिवाय शाळा कधीच बंद नव्हती, ती कोरोनाच्या महामारीत अचानक नाईलाजाने बंद ठेवावी लागली.
वयाची 3 वर्ष, 5 वर्ष पूर्ण झाली की लहान-लहान चिमुकले शाळेच्या आवारात यायची. आनंदाने शिकायची, बिनधास्तपणे बागडायची, मनमुरादपणे खेळायची, मनात कसलीच भीती नसायची, पण आज मात्र एखादा आजार होऊ नये. झाला तर, लगेचच बरा व्हावा अन् शिक्षण घेता यावं, त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत…
तीन वर्षांचा मुलगा व मुलगी खरं तर बालवाडीत यायला हवे होते, पण कोरोनाने थेट पहिलीत पाठवलं.
आमच्या हायस्कूलमध्ये तर बघा.. 4 थी पास झालेला मुलगा व मुलगी दोन वर्षांपूर्वी पाचवीत जाणार, हायस्कूलमध्ये जाणार, मोठ्या मुलांबरोबर खेळणार असे स्वप्न पाहात होता. मात्र, आज त्याला डायरेक्ट सहावीच्या वर्गातच बसायला मिळालं…हे जरी खरं असलं तरी दीड वर्षे झालीत पण प्रत्यक्ष शाळेत येऊन शिकायला मिळालं नाही. मी कधीच पाचवीच्या वर्गात बसलो नाही याची खंत मात्र कायम राहील…ऑनलाईनने किती ज्ञान मिळालं ? हा तर चर्चेचा विषय आहे..
यंदा तर 10 वीचा निकाल जाहीर झाला. सर्वच उत्तीर्ण झाले, 55 वर्षात कधीच 100 टक्के निकाल न लागलेल्या शाळांचाही निकाल 100 टक्के लागला…रेकॉर्ड वर उल्लेख झाला. आमच्याही शाळेचा निकाल 100 टक्के लागला होता, पण तो कोरोनाच्या काळात हे मात्र विसरता येणार नाही…
काहीही असो अखेर कोरोनाने माघार घेतली. शासनाने मुलांच्या बाजूने निर्णय घेतला आणि आजपासून शाळा चिमुकल्याच्या आगमनाने व आवाजाने गजबजल्या. आम्हाला तर मनस्वी खूप-खूप आनंद झाला आहे. चार दिवसांपासून चिमुकले पुन्हा शाळेत येणार म्हणून तयारी सुरू केली होती. शाळा स्वच्छ केल्या, गुढ्या, तोरण लावून शाळा सजल्या, सुंदर फलकलेखन करून स्वागत करत होत्या…हजारो विद्यार्थी आले. पालक आले. सर्वांनी सॅनिटायझर घेतले. मस्त रंगीबेरंगी मास्क लावले. सुंदर ड्रेस परिधान करून प्रवेश करू लागले. ढोल-ताशे वाजले, पुन्हा पितळी बेल खणखणली आणि माईकवरून सावधान-विश्राम आवाज ऐकू आला. देशाचे राष्ट्रगीत गायले गेले व शुभारंभ झाला.
लेखक – दिलीप अहिरे,
सीडीओ मेरी हायस्कूल, नाशिक
मो. 9420 59 4331
—