मुंबई – कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाची वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन होऊ द्यायचा नाही या निर्धाराने नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, विशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. यासंदर्भात केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पाऊले लगेच टाकावीत असेही त्यांनी स्पष्ट केले.