नाशिक : प्रतिनिधी
पृथ्वीच्या वातावरणातील सातत्याने होणारे बदल ही आपल्याला वारंवार मिळणारी धोक्याची घंटाच आहे. संपूर्ण जगातच वातावरणामध्ये काही न काही घडामोडी होताना आढळत आहेत. अवकाळी पाऊस, उष्णतेचा उंचावणार पारा, प्रचंड पूर, तर कधी कोरडा दुष्काळ, समुद्राच्या पातळीत अचानक वाढ या नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीतून बाहेर पडण्यात एकट्या भारत देशाचेच वर्षाकाठी काही लाख करोड डॉलर्स आर्थिक नुकसान भरपाई करण्यात आणि परिस्थिती सावरण्यातच जात आहेत. यावर त्वरित निर्णायक पावले उचलण्यामध्ये नाशिकच्या 18 वर्षीय तरुण वेदान्त राहूल कुलकर्णी हा सक्रीय सहभाग नोंदवतो आहे आणि उपाययोजनांवर वेदान्त महत्वाच्या सूचना मांडत आहे.
महत्वपूर्ण उपाय सुचवले
सद्यपरिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी वेगळ्या प्रभावी दिशेने वाटचाल करीत अभ्यासपूर्ण संशोधन करीत आत्तापर्यंत प्रभावी मार्ग त्याने प्रशासन आणि संयुक्त राष्ट्रसंघाला सुचविले आहेत. वेदान्त याने नुकतेच न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंब्लीत 77 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आपले योगदान दिले आहे. जेथे त्याने कार्बन उत्सर्जन कमी करण्यासारख्या बाबींवर आंतरराष्ट्रीय हवामान धोरण अधिक महत्त्वाकांक्षी बनवण्याबाबत त्याचे प्रस्ताव आणि शिफारसी दिल्या. 193 हून अधिक देशांतील मंत्री आणि प्रतिनिधी यांच्यासमवेत शासनाचे आर्थिक धोरण आणि वातावरणातील अनुकूलता याकरिता काही महत्वपूर्ण उपाय सुचवले.
अभ्यासपूर्ण मदत केली
वेदान्त याच्या प्रेरणादायी प्रवासाला संपूर्ण आकार घेण्यास तीन वर्षे लागली, सुरुवातीची दोन वर्षे वेदांतने संयुक्त राष्ट्रांच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या उद्दिष्टांबद्दल तरुणांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी शैक्षणिक कार्यशाळा आणि मॉडेल यूएन कॉन्फरन्सचे आयोजन करून सुरुवात केली आणि अनेक संस्थांना त्याने अभ्यासपूर्ण मदत केली. अनेक ऑनलाईन आणि ऑफलाईन वैयक्तिक इव्हेंटसद्वारे 171 देशांमधील हजारों तरुणांवर प्रभाव टाकण्यास व या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यास मदत केली.
`सीओपी – 26ʼ चे आमंत्रण
सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून पॅरिस कराराच्या 13 व्या धोरणावर शिफारसी देण्याचे काम केले. ज्यामुळे जगभरात चांगले प्रभावी कायदे होऊ शकतील. सप्टेंबर-2021च्या पृथ्वीच्या वातावरणातील बदल याविषयावर अभ्यास व काम करणाऱ्या तरुणांसाठी होणाऱ्या सीओपी – 26 पूर्व परिषद `युथ फॉर क्लाइमेटʼ या परिषदेकरिता इटली सरकारने वेदान्त याला खास आमंत्रित केले व गव्हर्नन्स कमिटीचे सदस्य म्हणून नियुक्त केले. वेदान्त याने निर्णायक दस्तऐवज तयार करण्यासाठी प्रतिनिधींची निवड करण्यात आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी कार्यक्रमाच्या एकूण अंमलबजावणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वेदान्त याची अभ्यासपूर्ण मेहनत, योगदान आणि पूर्वीच्या केलेल्या कामाची पावती म्हणजे `सीओपी – 26ʼ चे आमंत्रण. पुढे मार्गक्रमण करताना ऑक्टोबर – नोव्हेंबर 2021 मध्ये वेदान्त याने स्कॉटलंडच्या ग्लासगो येथील प्रसिद्ध सीओपी – 26 या आंतरराष्ट्रीय परिषदेत काम केले. जेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जस्टिन ट्रूडो, जो बायडन आणि तेथे उपस्थित तब्बल 120 राष्ट्रांचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांशी वैयक्तिकरित्या भेट घेऊन हवामान धोरणावर महत्वपूर्ण उपाययोजना मांडल्या व जागतिक स्तरावरील युवक वर्गाचे नेतृत्व केले आणि 140 पेक्षा जास्त देशांमधील 45 हजारपेक्षा जास्त तरुण आवाजांचा समावेश असलेल्या वातावरणातील बदल धोरण शिफारशी त्यांच्यासमोर सादर केल्या. त्यातील काही मुख्य शिफारशींमध्ये आर्थिक सहाय्यता व तंत्रज्ञान हस्तांतरण सुलभ करण्यासाठी दीर्घकालीन यंत्रणा उभारणे, तसेच वातावरण बदलामुळे आपत्तीजनक परिस्थितीसाठी विकसित देशांकडून विकसनशील आणि सर्वात असुरक्षित देशांना आर्थिक मदत कशी पोहोचवता येईल याचा समावेश होता. पॅरिस कराराच्या कामकाजात आवश्यक असलेले महत्त्वपूर्ण बदल वेदान्तयाने सुचवले. स्थानिक नेत्यांना, आदिवासी व तरूण पिढीला या धोरणात निर्णायक पातळीवर विचारात घेतले पाहिजे, त्यांची मते ग्राह्य धरले पाहिजेत, असे स्पष्ट केले.
शिफारशी महत्त्वपूर्ण ठरल्या
जरी या आंतरराष्ट्रीय वाटाघाटींमध्ये अनेक आव्हाने होती तरीही वेदान्त याने हे समर्थन आणि शिफारशी महत्त्वपूर्ण ठरल्या आणि ग्लासगो क्लाइमेट पॅक्टमध्ये त्यावर विचार केला गेला, जो युनायटेड नेशन्स सीओपी – 26 च्या शेवटी वेदान्त याने सुचविलेल्या उपाययोजनांचा समावेश अंतिम मेमोरँडममध्ये पक्षांनी स्वीकारला. तेव्हापासून वेदान्त पॉलीसी सेक्टरमध्ये आपले कार्यक्षेत्र वाढवीत आहे. जसे, त्याच्या या अभ्यासपूर्ण प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजे जून-2022 च्या लिसबन, पोर्तुगाल येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र महासागर या आंतरराष्ट्रीय परिषदेत वेदान्त याने ब्लू इकॉनॉमी आणि राष्ट्रीय महासागरीय संरक्षित क्षेत्रांमध्ये सागरी संसाधनांच्या गुंतवणुकीचा शाश्वत वापर यासारख्या मुद्द्यांवर उपाय प्रदान करताना महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
विश्लेषण आणि उपाय देत आहे
नदी, सरोवर आणि महासागर परिसंस्थेमध्ये नफा आणि टिकाऊपणा कायम ठेवण्यासाठी वेदान्त याने ताज्या आणि खाऱ्या पाण्याच्या स्त्रोतांच्या चांगल्या व्यवस्थापनावर उपाय प्रदान केले. मागील आठवड्यांमध्ये 13 ते 27 सप्टेंबर 2022 दरम्यान न्यूयॉर्क येथे वेदान्त याने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला भेट देऊन यूएन जनरल असेंब्लीदरम्यान संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यासह सध्याच्या शिक्षणप्रणालीत आवश्यक बदलाव, मानवीय आरोग्य, अन्नधान्याचा दर्जा, जागतिक शांतता आणि सुरक्षेशी पृथ्वीचे वातावरणाच्या परस्पर संबंधांवरही काम केले.
जागतिक धोरणातील त्याच्या सहभागाबरोबरच पृथ्वीच्या वातावरण बदलातील चढउतार याचे बारकाईने निरीक्षण करत आहे. पर्यावरण क्षेत्रातील आपली प्रगती पुढे नेण्यासाठी विश्लेषण आणि उपाय देत आहे.
वेदान्तच्या शब्दात… – पृथ्वीच्या वातावरणात होणारे बदल हे आपल्यासारख्या देशासाठी खरोखरच ज्वलंत असा मुद्दा आहे. याबाबत आपला भारत हा जगातील सर्वात असुरक्षित देशांपैकी एक आहे. – तुमच्या माझ्यामध्ये आणि आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये देखील हवामान बदलाविषयीची जागरूकता आणणे काळाची गरज आहे. – आपल्या भारतासारख्या देशात हा विषय पूर्ण क्षमतेने कृतीत उतरवून त्यावर आवश्यक निर्णय घेतले जातीलही जेव्हा हा निवडणुकीच्या मोहिमेचा विषय बनेल, तेव्हा पण त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवर आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीत काही लहानमोठे बदल घडवून आणणे आवश्यक आहे. आपले अन्न, फॅशन, वाहतूक आणि रोजच्या जीवनशैलीद्वारे कार्बन फूटप्रिंट कमी करणे आणि शासनाच्या प्रत्येक क्षेत्रात हवामान अजेंडा प्रवाहित करण्यासाठी आपल्या सरकारांना आवाहन करणे आवश्यक आहे.
संयुक्त राष्ट्रसंघात युवा सल्लागार
वेदान्त सध्या संयुक्त राष्ट्रसंघात युवा सल्लागार म्हणून आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (जागतिक आर्थिक मंच ) वर एक लेखक म्हणून जागृतीचे काम करत आहे.
संबंधीत अध्यक्षांसह कार्यकारी संचालक आणि अगदी नोबेल पारितोषिक विजेत्यांसह जगभरातील उच्चस्तरीय कार्यक्रमांमध्ये सादरीकरणे आणि भाषणे देण्याची उपलब्धी त्याची आहे.
वातावरणातील बदल, अन्न, शिक्षणप्रणालीपासून ते विश्वशांती आणि मानवीय सुरक्षिततेपर्यंतच्या मुद्द्यांवर प्रशासन आणि इतर भागधारकांना समर्थन देण्याच्या नवीन मार्गांसाठी तो सज्ज असून तदसंबंधित विषयावर काम करण्यास तो इच्छुक आहे.
मध्यन्तरी वेदान्त याला सामाजिक क्षेत्रात अत्यंत महत्वपूर्ण कार्य करणारे एक प्रभावी युवानेतृत्व म्हणून दिला जाणारा प्रिन्सेस डायना अवोर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वेदान्त हा आदर्श
युनायटेड नेशन्स सीओपी- 27 आणि इतर महत्त्वाच्या परिषदांमध्ये वेदान्त त्याच्या संशोधन आणि कौशल्याद्वारे योगदान देत आहे… नक्कीच, आम्हाला विश्वास आहे की आजच्या अभ्यासक तरुणांना ह्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आणि सद्यस्थिती बदलण्यावर निर्णय व परिणामस्वरूप काम करण्यात वेदान्त हा आदर्श ठरेल.
संपर्क : 9172343813
—