सेंट्रल हिंदू मिलीटरी एज्युकेशन सोसायटीच्या गुणगौरव सोहळ्यात कोविड काळात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कोविडयोद्धे यांच्या समवेत डॉ.भरत केळकर, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. मच्छिंद्र कदम, संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपाद नरावणे, कार्यवाह हेमंत देशपांडे.
—
नाशिक : प्रतिनिधी
राज्य घटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ति स्वातंत्र्य दिले आहे. जे नागरिकांना आहे तेच माध्यमांना आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या विषयात माध्यमांनी आपली भूमिका काळजीपूर्वक निभावणे आवश्यक आहे. सद्यस्थितीतील घटना लक्षात घेता देशासमोरील असलेल्या आव्हाने याचा विचार करून योग्य शब्दात राष्ट्रीय मत मांडण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. विनय चाटी यांनी केले.
यांची उपस्थिती
सेंट्रल हिंदु मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे कॅम्पस परिसरात कोविड योध्दे, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळा झाला. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. जनजाति कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष डॉ. भरत केळकर अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. मच्छिंद्र कदम, संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपाद नरावणे, कार्यवाह हेमंत देशपांडे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी डॉ. केळकर, चाटी, कदम यांच्या हस्ते सीआयआय महाराष्ट्राचे अध्यक्ष सुधीर मुतालिक, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी शिक्षण समितीचे सदस्य महेश दाबक, संस्थेचे उपाध्यक्ष व भारत सरकारच्या खाण उद्योग मंत्रालयद्वारा हिंदुस्तान कॉपर लिमिटेडचे संचालक ॲड. अविनाश भिडे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नामनिर्देशित नागरी सहकारी बँक लेखापरीक्षण, प्रशासन आणि अनुपालन सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश पाठक, स्कूल ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड लेबर स्टडीज टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अभ्यास मंडळ सदस्य ऋषीकेश जोशी, किल्ला संरक्षक समिती, महाराष्ट्र शासन सदस्य ऋषीकेश यादव यांच्यासह कोविड योध्दे, शिक्षक,प्राध्यापक, साहसीवीर, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. चाटी म्हणाले, विद्यार्थी, शिक्षक यांच्या सहभागातून शैक्षणिक संस्थांना नावलौकीक मिळत असतो, त्यांच्याप्रती ऋणभाव व्यक्त करणे हा एक संस्कार असून तो अशा कार्यक्रमांतून आपल्याला पहायला मिळतो, संस्थेचा हा उपक्रम निश्चित गौरवास्पद आहे. आज जम्मू काश्मीरमधील झालेला बदल, सत्य परिस्थिती ही देशासमोर येण्याची आवश्यकता आहे. गेल्या ७० वर्षात झालेल्या घडामोडींचा ऊहापोह यानिमित्ताने व्हायला हवा. प्रत्येक वेळेस या देशावर आक्रमण झाली या आक्रमणाबद्दल अधिक सांगितले गेले. पण देशाने परतवलेले आक्रमण याबद्दल फारसे कुणी बोलले नाही. त्यामुळे एका ठराविक समूहाला वाटायला लागले की ही देश आमची मक्तेदारी आहे.
गैरसमजुती दूर करण्याचे आव्हान
डाॅ. चाटी म्हणाले, आज असा एक गैरसमज आहे कि, या देशाला फक्त ७० वर्षाचा इतिहास आहे. अशा अनेक गैरसमजुती माध्यमांनी दूर करण्याची आवश्यकता आहे. माध्यमांनी राष्ट्रीय भूमिकेतून या सगळ्यांकडे पहाण्याची गरज आहे. या देशाच्या संस्कृती, परंपरा याची नाळ जोडताना एकत्व असणे आवश्यक आहे. देश म्हणून राष्ट्र म्हणून मांडणी करताना माध्यमे फार मोठी भूमिका बजावत असतात.
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात देशासंबधी अनेक विषयांचा विचार केला गेला आहे. त्यामुळे माध्यमांच्या बरोबरीने शिक्षकांची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण नविन ऊर्जा निर्माण करणारे आहे. आम्ही विद्यार्थ्याना नेमकी काय देणार आहोत. माध्यमे, ज्ञान आणि शहाणपण या शिक्षण व्यवस्थेतील तीन महत्वाच्या पायऱ्या आहेत, असेही डाॅ. चाटी म्हणाले.
डॉ. कदम यांनी शिक्षकांनी शैक्षणिक प्रक्रीयेत जास्तीत जास्त योगदान द्यावे, आपला सहभाग असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यवाह देशपांडे यांनी प्रास्तविक केले व आपल्या प्रास्तविकात कोव्हीड काळात संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी संस्थेवर जो विश्वास दाखविला व सामाजिक भान राखून सामाजिक कार्य केले, त्याबद्दल भोसला परिवारातील सगळ्या सदस्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
विद्या प्रबोधीनी (इंग्रजी माध्यम) च्या मुलांनी स्वागतगीत म्हटले. निलिमा दलाल यांनी पद्य म्हटले. प्रांजली आफळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.प्रिती कुलकर्णी यांनी आभार मानले. पूर्वांचलच्या विद्यार्थींनीनी म्हटलेल्या वंदेमातरमने सांगता झाली.
—