नाशिक : प्रतिनिधी
माझ्यात जे ईश्वरीतत्व आहे, तेच दुसर्याही व्यक्तीमध्ये आहे, हे समजणे म्हणजेच आपल्यातील जीवन चेतनेचा स्तर उंचावणे आहे. हा स्तर उंचावण्यासाठी अलौकिक योगविद्या आत्मसात करावीच लागेल. यातून वैश्विक शक्ती आपल्याबरोबर आहे याची जाणीव होईल आणि वैश्विक शक्ती आपल्या बरोबर आहे हा विश्वास निर्माण झाला की आपल्याकडे जे आहे, ते सतत दुसर्याला देण्याची सवय लागेल. म्हणजे समाज सुंदर होण्यासाठी काम करीत राहता येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ योगाचार्य व प्रेरणादायी वक्ते प्रा. राज सिन्नरकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 75 योग पुष्प व्याख्यानमालिकेत प्रा. सिन्नरकर बोलत होते. चेतनेचा स्तर उंचावण्यासाठी योग हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. याप्रसंगी संचालक अमित मिश्रा, सहसंचालक चंद्रज्योती दळवी उपस्थित होते.
प्रा. सिन्नरकर म्हणाले की, प्राचीन ॠषी-मुनींची ग्रंथसंपदा म्हणजे हिरे माणके आहेत, चेतनेच्या उच्च स्तरावर जगण्यासाठी ॠषी-मुनींनी हे ग्रंथरूपी हिरे आपल्या हातात दिले आहेत. यातच भगवद्गीता, पातंजल योग सूत्र,योगवासिष्ठ आदींचा समावेश आहे. भगवद्गीता वाचून त्यातील तत्वज्ञान जीवनात आणावे. त्यात तीन योग म्हणजे कर्मयोग, भक्तीयोग व ज्ञानयोग आहे.
कर्मयोगाने जसा चेतनेचा स्तर उंचावतो, तसेच परमात्मा हा आपल्यातच आहे, हे समजले पाहिजे, हा ज्ञानयोग आहे. भक्तीयोगही समर्थ आहे. पण, त्याद्वारे भौतिक गोष्टी मागू नये. त्याऐवजी माझा चेतनेचा स्तर उंचवावा, अशी मागणी करावी. मला मानवतेसाठी जगायचे आहे, जो मला भेटेल त्याचे आयुष्य सुंदर होईल, अशी अपेक्षा ठेवायची आहे. त्यानूसार कार्य करायचे, म्हणजे वैश्विक शक्तीसमोर मान उंच राहिल, असेही प्रा. सिन्नरकर यांनी सांगितले.
प्रा. सिन्नरकर पुढे म्हणाले की, बुद्धिमान माणूस समाजाला अधिक फसवतो, ही विषण्ण करणारी स्थिती आहे. लोक स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचे नुकसान करतो. एवढा त्यांच्या चेतनेचा स्तर बधीर झाला आहे. योगविद्येने ही स्थिती सकारात्मक होईल.
यावेळी योगशिक्षक महासंघाचे यू. के. अहिरे यांनी सूत्रसंचालन केले.
—