आधुनिक युगातील महान गृहस्थ क्रियायोगी योगावतार लाहिरी महाशय यांचा आविर्भाव दिवस
लाहिरी महाशय हे सर्व काळातील महान गुरूंपैकी एक होते. त्यांचे मूळ नाव श्यामा चरण लाहिरी होते आणि ते बनारसचे रहिवासी होते. ज्याद्वारे सर्वोच्च आध्यात्मिक अवस्था प्राप्त होऊ शकते, अशा संतुलित जीवनाचे ते एक उदाहरण होते. लाहिरी महाशय हे सर्वसाधारण लोकांसारखे एक गृहस्थ होते, परंतु नीरस दैनंदिन जीवनामध्येही ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी, ते त्यांच्या जाणिवेचे स्तर वाढविण्यास सक्षम होते.
लाहिरी महाशय हे अतुलनीय चिरंजीव संत महावतार बाबाजी यांचे अग्रगण्य शिष्य होते. लाहिरी महाशय स्वतः स्वामी श्री युक्तेश्वर गिरी यांचे गुरु होते; जे योगी कथामृत [ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी] चे लेखक श्री श्री परमहंस योगानंद यांचे गुरु होते.
योगी कथामृत या अभिजात आत्मचरित्रात लाहिरी महाशयांच्या जीवनातील मुख्य घटनांचे तपशीलवार वर्णन केले आहे. त्यापैकी एक घटना आजही वाचकांच्या मनाला खिळवून ठेवते. एका ‘चुकून पाठवलेल्या’ तारेमुळे लाहिरी महाशयांची राणीखेत या गावी बदली होते आणि ते तिथे हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये मुक्तपणे भटकंती करत असताना त्यांची आणि बाबाजींची आश्चर्यकारक भेट होते; ही घटना आता एक आख्यायिका बनली आहे. योगी कथामृत वाचण्याचे भाग्य लाभलेल्या सर्वांसाठी बाबाजींसोबतचा त्यांचा संवाद अत्यंत प्रेरणादायी आहे.
लाहिरी महाशयांचे जीवन म्हणजे ईश्वरी साक्षात्काराकडे जाण्याच्या एका संतुलित तरीही ध्येयनिष्ठ मार्गाचे उदाहरण होते. रामू, अंध भक्त आणि एक अपत्यहीन महिला अभोया यांसारख्या सर्वसामान्य अनुयायांचे जीवन उंचावणाऱ्या आपल्या आश्चर्यकारक चमत्कारांद्वारे त्यांनी लाखो लोकांना प्रेरणा दिली. त्यांचे नियोक्ता – अधिकारी असलेल्या एका ब्रिटीश गृहस्थांना लाहिरी महाशयांच्या आध्यात्मिक सिद्धीचा लाभ झाला, जेव्हा त्यांची आजारी पत्नी, हजारो मैल दूर असूनही, एखादी जादू व्हावी तशी बरी झाली. तरीही, या महान संताच्या जीवनातील सर्वात लक्षवेधक आणि पथदर्शक योगदान म्हणजे महावतार बाबाजींच्या आशीर्वादाने क्रिया योगाच्या लोप पावलेल्या विज्ञानाचे पुनरुज्जीवन करण्यामधील त्यांची महत्वाची भूमिका. त्यामुळे लाहिरी महाशय हे अत्यंत महत्त्वाच्या क्रिया योग तंत्राचा आधुनिक युगातील सत्य शोधकांमध्ये सूक्ष्मपणे प्रसार करणारे अग्रदूत आणि मुख्य सूत्रधार बनले.
योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया आणि सेल्फ रिअलाइझेशन फेलोशिपची स्थापना करणाऱ्या योगानंदजींना त्यांचे परमगुरु लाहिरी महाशय यांच्याकडून अविरतपणे प्रेरणा मिळत होती. जेव्हा ते त्यांच्या प्रिय आईच्या कडेवरील एक अगदी लहानसे बाळ होते, तेव्हा या महान गुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला होता आणि पुढील संस्मरणीय भविष्यवाणी केली होती, “छोटी आई, तुझा मुलगा योगी होईल. एका आध्यात्मिक इंजिनासारखा, तो अनेक आत्म्यांना ईश्वराच्या साम्राज्यात घेऊन जाईल.”
भगवद्गीता आणि बायबल या महान धर्मग्रंथांत सांगितलेल्या तत्त्वज्ञानावर योगानंदजींची शिकवण आधारलेली आहे आणि त्यांचे ‘जगायचे कसे’ या विषयीचे पाठ तसेच त्यांची असंख्य प्रकाशने यांच्यामध्ये ती सुंदरपणे संकलित केलेली आहे. ईश्वराचा प्रत्यक्ष वैयक्तिक अनुभव मिळावा ही सर्व मनुष्यमात्रांची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला आणि हेच त्यांनी जनसामान्यांना दिलेल्या संदेशाचे सार आहे. जेव्हा लाहिरी महाशयांनी बाबाजींना सर्व निष्ठावान भक्तांना क्रिया योगाचे ज्ञान देण्याची परवानगी मागितली, तेव्हाच त्यांनी ही ऐतिहासिक शिकवण सामान्य स्त्री-पुरुषांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग प्रशस्त केला होता.
लाहिरी महाशय यांची जयंती (अविर्भाव दिवस) 30 सप्टेंबर रोजी असते आणि त्यांचा महासमाधी दिवस 26 सप्टेंबर रोजी येतो. लाहिरी महाशय यांनी आपल्या साध्यासुध्या जीवनाची सुरुवात घुरणी नावाच्या एका छोट्याशा गावात केली होती, परंतु पुढे ते या पृथ्वीवर वास्तव्य करणाऱ्या सर्वोच्च संतांपैकी एक म्हणून ओळखले जाऊ लागले. आजच्या आधुनिक युगात लाखो लोक क्रियायोगाचा मार्ग अवलंबतात, ही बाब भारतातील महान योगावतार, लाहिरी महाशय यांच्या जीवनाच्या यथार्थतेचे प्रमाण आहे. अधिक माहिती : yssi.org
लेखकः विवेक अत्रे