भीमरूपी महारुद्रा

0

निराभिमानी, संवाद कौशल्य, आदर्शवाद, समाधानी, वीर बजरंग, चारित्र्यवान, विनम्रता, योजना बद्धता या गुणां बरोबरच मांगल्य, बल, पवित्रता या दिव्य गुण असणाराचाच जन्मोत्सव साजरा होत असतो.

भारत ही तपोभूमी, महात्म्यांची जन्मभूमी, तशीच ती देवभूमी म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर रुढी, रितीरिवाज आणि परंपरा सांभाळणारी देश भूमी म्हणून देखील ओळखली जाते.
आनंद आणि मांगल्याचे स्वरुप असलेल्या हनुमंताचा जन्मोत्सव संपूर्ण देशात भक्तिभावाने साजरा केला जातो.
हनुमंताच्या नामस्मरणाने, स्तोत्रपठणाने, उपासनेने, चैतन्य  व दिशा प्राप्त होते, अशी भक्तांची धारणा आहे. हनुमान हे शक्ती बरोबर प्रचंड ज्ञान व उर्जा देणारे श्रीरामाचे परम भक्त आहेत. नवविधा भक्तीच्या माध्यमातून आपले कर्म सर्वस्वी श्रीरामाला अर्पण करीत, परम ज्ञानाने व शुद्ध भक्तीने ते रामाला अतिप्रिय झाले. आनंद आणि मांगल्याचे स्वरुप म्हणजे श्री हनुमान. वेद, पुराण, शास्त्रानुसार हनुमान अजुनही भूतलावर आहेत. जेथे जेथे श्रीरामाचे भजन होते, तेथे ते कुठल्या न कुठल्या रुपाने हजर असतात.
मारुती हे गावाचं आराध्य दैवत असतं. भगवंताने भक्तांना जे दिव्य गुण वाटप केले, त्यात ‘यश’ पहिला गुण मारुतीला दिला गेला.
” यश थोरविला मारुती। बिभीषण केला लंकापति । औदार्य देऊन कर्णा हाती । किर्ती दिगंत्तर मिळविली।।
ज्ञाने उपदेशीला चतुरानन। ऐश्वर्य वाढविला अर्जुन। वैराग्य शुकाचे बोधुन। ब्रह्मसनातन पावविले।।
भक्तिमार्गाने मानवी जीवन यशस्वी व्हावं, सात्विक सेवेची भावना आत्मसात व्हावी, म्हणून गावोगावी मारुतीची मंदिरे आहेत.
समर्थ रामदासांनी गावोगावी व्यायामशाळा व आखाडे तयार केले. या शक्तिचा वापर जगाच्या कल्याणासाठी व्हावा  म्हणून त्याला भक्तिची जोड देऊन गावोगावी मारुतीची मंदिरे बांधली.
भक्तिमुक्त शक्ती मानवाला दानव बनवते, तर भक्तियुक्त शक्ती मानवाला देवत्व प्राप्त करुन देते.
रामायणात रावण आणि हनुमान दोघेही बलवान होते. रावणाने शक्तिचा वापर भोगासाठी केला, तर हनुमंताने शक्तिचा वापर रामकार्यासाठी केला.
रामदास स्वामींनी शरीर कमावणे, बळ मिळवणे याला फार महत्व दिले. बळाचे मूर्तिमंत रुप म्हणून मारुतीची उपासना केली जाते. रामदासांनी भीमरुपी या स्तोत्रात मारुतीच्या बळाचे, महान कार्याचे वेगवेगळे पैलु वर्णिले आहेत.
प्रचंड मोठा दिसणारा, महादेवाचा अवतार, प्रचंड वेगवान तर वनेची वने उपटणारा, दुर्जनांचा विनाश स्वबळावर घडवून आणणारा, अंजनी मातेचा पुत्र व रामाचा दूत म्हणजे मारुती.
प्रचंड ताकदवान, प्राणदाता, सर्वांना सुख देणारा, दुःखाचा नाश करणारा, सुदंर, देखणा असा हा मारुती.
पारलौकिक, लोकांचा पालक, जीवनाचा रक्षक, आजतागायत अमर असलेला हा मारुती. पुण्यवंत, आनंददायक, काळाचा थरकाप उडवणारा, मृत्यु ज्याला भितो, ज्याच्या डोळ्यात सारे ब्रह्मांड सामावलेले आहे असा मारुती. शेपूट फुलारलेले, डोईवर मुकुट, कानांत सुदंर कुंडले, सोन्याची कसोटी कंबरेला बांधलेली असा हा मारुती. उभा राहीला की पर्वतासारखा वाटतो. शरीर बांधेसुत, शेपटी विजेसारखी चपळ, लक्ष्मणाचा प्राण वाचविण्यासाठी प्रचंड वेगाने द्रोणागिरी आणणारा हा मारुती. अष्टसिध्दी प्राप्त असणारा, ब्रह्मांडा एवढा आकार घेणारा असा हा मारुती.
अशा या बल, बुद्धी व अलौकिक कार्य करणाऱ्या मारुतीच्या दर्शनाने रोग, व्याधी व अदृश्य शक्तींचा नाश होतो.
श्री रामाच्या दासात प्रथम गणल्या जाणार्‍या, कपि वानर कुळाचा भूषण असणाऱ्या, रामाशी एकरुप झालेल्या मारुतीची ही स्तोत्ररुपी उपासना.
रामदास हे मोठे अधिकारी पुरुष ह़ोते. त्यांनी रचलेल्या या मारुतीच्या स्तोत्रातून एक चैतन्य, उभारी, संकटांशी सामना करण्याची शक्ती प्राप्त झाल्याचा अनुभव आजही भक्तांना येतो.
ब्रह्मचर्य, मांगल्य, बल व पवित्रतेची आदर्श मूर्ती म्हणजे हनुमंतराय. मनातील काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर यांना तर त्यांनी जिंकलेच पण इंद्रजितासारख्या बाह्य शत्रुचा सुध्दा पराभव केला.
मनोजवं मारुततुल्यवेगं। जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्टम्।। वातात्मजं वानरयुतमुख्यं। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।।
हे मारुतीचं संक्षिप्त वर्णन आहे. मारुतीला रुद्राचा आकरावा अवतार मानण्यात येतो. रावणाला जिंकणारा तो वीर आणि रामाला जिंकणारा तो दास होता, म्हणून तो वीर ठरला.
निराभिमानी, संवाद कौशल्य, आदर्शवान, समाधान, वीर बजरंग, चारित्र्यवान, विनम्रता, योजना बध्दता, मानसशास्त्र, राजनिती, शास्त्राचे ज्ञान असणाऱ्या दिव्यत्वाचाच जन्मोत्सव साजरा केला जातो.
हनुमंताच्या नित्य स्तोत्र पठणाने, उपासनेने, दर्शनाने वेगळाच आनंद मिळतो. देवाचं, संतांचं, थोरा मोठ्यांचं दर्शन घेणे हा मानवाचा सर्वांत उत्तम गुण आहे. यातून नम्रता, विनय, आदर, मान, श्रध्दा, सेवा, अनन्यता, शरणांगती असे भाव प्रगट होतात. दर्शनाने आयुष्य, विद्या, यश, बल यांच्यात वाढ होते. स्त्री, पुरुष, बालक, वृध्द, तरुण कोणीही हनुमंताची उपासना करु शकतं. त्यास कोणतंही विधी विधान नाही. स्तोत्र पठणाने चमत्कारिक अनुभव प्राप्त होतात. सगळ्या कामात सफलता मिळते, सकारात्मक उर्जा निर्माण होते.
कर्मकांड, उपासना म्हणजे भक्ती नाही तर जो देवाशी जोडला जातो, तो भक्त. कोणत्याही देवतेची सेवा करतांना त्याचं आचरण आत्मसात करणं आवश्यक असतं. जीवनात सर्वात महत्वाचा विश्वास पाहिजे. आमच्यात विश्वास, समर्पण, सेवाभाव नाही. त्यामुळे कोणत्याही कर्माचं फळ प्राप्त होत नाही. मनाच्या शुध्दी शिवाय देवाची प्राप्ती नाही. कारण चोखट मनात देव वास्तव्य करतो.
जरी जयांचे चोखटे मानसीं। मी होऊन असें क्षेत्रसंन्यासी। जयां निजेलियातें उपासी। वैराग्य गा।।ज्ञा।
खरा भक्त जे बघेल ते दर्शन, ऐकेल ते श्रवण, जे काय करील ती पूजा, बोलेल ते स्तवन, चालेल ती प्रदक्षिणा आणि झोपेल ती समाधी हे सामर्थ्य प्राप्त होते.
सद्विवेकाने प्रार्थना करु या, हनुमंत आमचे -हदयात सदैव राहोत. आम्ही कर्तव्यनिष्ठ होऊन, प्रिती परायण होवोत. भक्ति आणि शक्तिच्या या देवतेला साष्टांग नमस्कार.

                           – अनंत भ. कुलकर्णी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.