नाशिक : प्रतिनिधी
येथील श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या महावीर पॉलिटेक्निकचे प्राचार्य संभाजी व्यंकटराव सगरे यांना सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यापीठ,भोपाळ येथून मॅकेनिकल इंजिनिअरिंग या विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.
डॉ. संभाजी सगरे यांनी “पॅरामेट्रिक ऑप्टिमायझेशन इन डब्ल्यू.ई.डी.एम. मशिनिंग प्रोसेस फॉर ओ.एच.एन.एस. स्टील ॲण्ड इट्स एक्सपेरिमेंटल व्हॅलिडेशन”या विषयावर संशोधन करून राधाकृष्णन विद्यापीठ येथे शोधप्रबंध सादर केला होता. विद्यापीठाच्या समितीने सदर शोधप्रबंध मान्य करत, प्रा. सगरे यांस पीएचडी पदवी प्रदान केली. त्यांना सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यापीठातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील डॉ. एस. एस. पवार यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला पुरविल्या जाणाऱ्या अनेक लष्करी विमान साधनांपैकी एका साधनाचे सर्वोत्तमीकरण (ऑप्टिमायझेशन) करण्याची पध्द्त त्यांनी शोधून काढली आहे. या यशासाठी कुटुंबातील त्यांची पत्नी,आई, बहीण, भाऊ, मित्र तसेच महावीर कॉलेजचा मित्र परिवार यांचा मोलाचा वाटा आहे, या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
डॉ. सगरे यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हरीश संघवी, कार्यकारी विश्वस्थ राहुल संघवी, सोसायटीच्या समन्वयिका तसेच डीन डॉ. प्रियंका झंवर, वरिष्ठ प्रा. संजय भामरे, श्री महावीर इन्स्टिटूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अनिल जाधव, संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य प्रा. नवनाथ पाळदे, शिक्षक आदींनी अभिनंदन केले आहे.
—