नाशिक : प्रतिनिधी
पंचवटीतील मेरी-रासबिहारी लिंक रोडवरील अवधूत कॉलनीतील कोणत्याही रस्त्यावर पथदीप अद्याप नसल्याने गेल्या आठ दिवसापासून भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. रोज रात्रीच्या २ ते ३ वाजेच्या दरम्यान भुरटे चोर येऊन मोबाईल व इतर महागड्या वस्तू चोरून पसार होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने पथदीपांची तातडीने व्यवस्था करावी,अशी मागणी होत आहे.
कॉलनीतील रहिवाशी वीज, पाणी व रस्ते व्हावे म्हणून वारंवार मागणी करीत आहेत. पण, लोकप्रतिनिधी व मनपाचे अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.
याठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून वीज आली असल्याने व स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर नसल्याने अनेक वेळा अंधाराचे साम्राज्य देखील असते. मनपाचे सर्व प्रकारचे कर नागरीकांनी वेळोवेळी भरले असतानाही वीज, पाणी, रस्ते यांची व्यवस्था नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी दिलीप अहिरे, गणपत शिंदे, मिथुन पवार, ॲड. डोखळे, सुधीर भामरे, प्रसाद भामरे, मनोहर गवळी, हेमंत सोनवणे, गजानन पांडव आदींनी केली आहे.
अवधूत कॉलनीत लाईट नसल्याने भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. लाईटची तातडीने व्यवस्था करावी.
– सुधीर भामरे, स्थानिक नागरिक
—