आपल्या हातात वर्तमान असून, वर्तमानाचे कर्म सत्य मनाने करत विचार याचा करावा की, आपल्या कर्माला किती श्रेष्ठता प्राप्त करुन देता येईल. मानवाचे सत्कर्म हा त्याचा सुगंध असतो. शुभकामनेतून मनाला शांत आणि स्वच्छ ठेवत कर्म केल्यास, ते फुलासारखे सुंदर आणि सुगंधीत होईल.
—
राधेचं प्रेम, बासरीचा गोडवा, लोण्याची चव, सवंगड्यांशी आनंद, गोपींची रास, वात्सल्याचा भाव, ईश्वराच्या साकार रुपाचा भाव, यातुन कृष्ण जन्माचा आनंदीआनंद मिळतो.
प्राणस्वरुप, दु:खनाशक, सुखस्वरुप, तेजस्वी, पापनाशक, सत् चित् आनंद स्वरुप, शुध्द आनंदाची अनुभूती देणारा, शक्तिमान, ज्ञानसागर, प्रेमसागर, निर्विकार, निर्विकल्प, प्रकाश स्वरुप, दयाळु अशा गुणांचा सागर असलेला ईश्वर निराकार आहे. निराकार परमात्मा साकार रुपाने प्रगट झाला तर तो नक्कीच श्रीकृष्णा सारखा असेल.
आपल्या जीवनात डोकावल्यास श्री कृष्ण चारित्र्य मानवी जीवनाशी निगडित असल्याचं जाणवतं. आपल्या जीवनातील संघर्ष श्री कृष्णाच्या चरित्रातून दिसून येतो. एव्हाना आपल्या जीवनातील संघर्षाचे उपाय श्री कृष्ण चरित्रात पहावयास मिळतात.
संघर्षाचे दुसरे नावच श्रीकृष्ण. जन्म कारागृहात, जन्मताच आईवडीलांचा दुरावा, नंद-यशोदा पण दुरावले, जिच्यावर प्रेम केलं ती राधा पण दुरावली. मथुरेपासून दूर जावं लागलं, द्वारका स्वत: निर्माण केली ती समुद्रात बुडाली. पण कृष्णाने एक गोष्ट शेवटपर्यंत नाही सोडली ती म्हणजे चेहऱ्यावरचं हास्य आणि सकारात्मक वृत्ती. म्हणून श्री कृष्णजन्म मानवी जीवनाला चैतन्य प्राप्त करुन देणारे, उत्सवाचे एक प्रतिक आहे.
एका कंसाचा संहार करण्यासाठी, श्रीकृष्णाला जन्म घ्यावा लागला. आज तर हजारो कंस, कीचक, दु:शासन, दुराचारी दुर्योधन, जरासंध, शिशुपाल आहेत. आज मानवाच्या शांतीसाठी श्री कृष्णजन्म फक्त उत्सव न राहता, तो एक विचार होण्याची गरज आहे.
” कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। “
हा गीतेतील उपदेश संपूर्ण गीतेचं सार आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कर्म करण्याचा मानवाचा अधिकार आहे, पण त्याच्या फळाची आसक्ती धरु नये. वारंवार फलाच्या प्राप्तीची कामना केली की, यशापयशाच्या चिंतनाने मनुष्य कोणतेच कर्म व्यवस्थितपणे पार पाडू शकत नाही. कर्मात आनंद घेत घेत मनाची प्रसन्नता राखणं हेच कर्माचं साफल्य आहे.
आपल्या हातात वर्तमान आहे. वर्तमानाचे कृत्य सत्य मनाने करावे. आणि विचार याचा करावा की, आपल्या कर्माला किती श्रेष्ठता प्राप्त करुन देता येईल. विश्वास ठेवा वर्तमान कर्माला सत्य मनाने जर पार पाडले तर, भीती स्वतः निघून जाईल. तसंच फळ निश्चित मनाने गोड राहील.
हताश झालेल्या व्यक्तिला वाटतं माझ्याच्याने कोणतंच कार्य व्यवस्थित पार पडत नाही. संसारात अशक्य असं काहीच नाही. कोणतीच व्यक्ति अयोग्य नसते. त्यामुळे त्याला योग्य बनवतो तो त्याचा विचार. यासाठी स्वत:ला जाणा, आपल्या अंतरमनाला जागवा. आपण आपल्या सत्कर्माला महत्व द्या.
फळाची अपेक्षा न ठेवता लक्षापर्यंत पोहचण्याच्या यात्रेचा आनंद घ्या. श्रीकृष्ण ईश्वर होते. ते भविष्यात काय होईल ते जाणत असुन सुद्धा वर्तमानात जगत होते. संघर्ष करीत उद्याची चिंता न करता, आजचा आनंद घेत होते. श्री कृष्णाने काम, क्रोध, अहंकार न करता शांतीला आत्मसात केलं. श्रीकृष्ण द्वारकेचे राजे होते. कुशल योद्धे होते, पण हे सर्वकाही असुन सुध्दा विनम्र राहत . दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न करीत. कारण विनम्रतेशिवाय मोठ्यात मोठं यश सुध्दा बेकार असतं. देव असुन सुद्धा अर्जुनाचे सारथी झाले. ते शिकवत की, कामाला मोठं किंवा छोटं न मानता त्यावर प्रेम करावं.
जर भ्रष्ट शक्ति सत्य आणि मानवतेचा नाश करण्यासाठी आक्रमक होत असतील तर त्यांचा नाश करण्यासाठी कठोर व्हावेच लागेल. नाहीतर नैतिकता अर्थहीन होईल.
शरपंजरी पडलेले पितामह कृष्णास विचारतात,’कृष्णा ‘ आचार्य द्रोणाचा वध, दुर्योधनाच्या मांडीखाली प्रहार, दु:शासनाच्या छातीची चिरण, जयद्रथाचा छळ, कर्णाचा वध, हे सारं तू अनितीने केलंस. जग जाणत असेल महाभारताला भीम आणि अर्जुनाने जिंकलं पण मी सारं जाणतो. सांग, ही तुझी निती युध्दात योग्य होती का? कृष्णा तू स्वतःला सातव्या युगातील मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाचा अवतार सांगतोस. ही अनैतिकता संस्कारांचा भाग कसा होईल ?
श्री कृष्ण सांगतात, निर्णय हा वर्तमान परिस्थीतीवर घेतला जातो. श्रीराम त्रैतायुगाचे तर मी द्वापारयुगाचा नायक होतो. आमचे दोघांचे निर्णय एकसारखे कसे होऊ शकतील. श्रीरामाच्या युगातला रावण खलनायक ह़ोता पण तो शिवभक्त होता. रावणाच्या नकारात्मक परिवारात बिभीषणासारखा संत होता. वाली सारख्या खलनायकाच्या जीवनात तारा व अंगद सारखे सज्जन होते. खलनायक पण धर्माचे ज्ञान ठेवत होते. त्यामुळे रामाने त्यांच्या सोबत छळ नाही केला. माझ्या युगात जरासंध, दुर्योधन, दु:शासन, शकुनी, व जयद्रथ, अशा पाप्यांना संपवण्यासाठी केलेल्या अनितीचा वापर योग्यच होता.
कलियुगात याही पेक्षा फार मोठ्या अनैतिक नितीचा वापर करावा लागेल. जर दुष्ट शक्ति सत्य आणि मानवतेचा समूळ नाश करण्यासाठी आक्रमण करतील तर त्यांचा नाश करण्यासाठी कठोर व्हावेच लागेल, नाहीतर नैतिकता अर्थहीन होईल.
मानवाचे सत्कर्म हा त्याचा सुगंध असतो. शुभकामनेतून मनाला शांत आणि स्वच्छ ठेवत कर्म केल्यास ते फुलासारखे सुगंधीत होईल.
आयुष्यभर काया, माया आणि धाया मागे धावणाऱ्या मनुष्यास अंतिम वेळेला तिन्ही सोडून जातात. जीवनभर धावपळ करुन काहीच कामाला येत नाही. कामाला येतो तो आपला प्रेम पूर्ण व्यवहार. हेच प्रेम जीवनाला उभारी देतं.
बाभळीला तोडलं जातं,तर पिंपळाच पूजन होतं. पिंपळ वाटसरुला सावली, पक्ष्यांना आसरा देऊन श्रमपरिहार करतो. काटे टोचून दूर करत नाही. जर आपणास सन्मान पाहीजे तर पिंपळासारखं बनावं लागेल. काही देणं, आनंद, सुख, छाया वाटणं शिकावं लागेल . तेंव्हाच सन्मान स्वत: आपल्याकडे चालत येईल.
जय श्रीकृष्ण
– श्री. अनंत भ. कुलकर्णी
बीड