नाशिक : प्रतिनिधी
विज्ञान हा विषय विचार करण्याचा आहे. एज्युकेशन याचा अर्थ आतून बाहेर काढणे. ज्ञानापेक्षा प्रज्ञा महत्त्वाची असते. विज्ञान म्हणजे विशिष्ट असे ज्ञान तर, साहित्य म्हणजे जे आपणास सोबत घेऊन जाते. प्रत्येकाने आयुष्यात तीन मित्र जोडावेत ते म्हणजे का? कसे? व काय? यातून व्यक्तीची प्रगती होते. शाळेने राबविलेल्या उपक्रमांचा मूळ हेतू ‘विद्यार्थ्यांचा मनातून, डोक्यातून रचनाशीलता बाहेर काढणे. यासाठी कथा, प्रश्नमंजुषा, विज्ञान कथा, पुस्तकांचे वाचन उपयुक्त ठरते, असे प्रतिपादन महापालिकेचे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विजय निपाणेकर यांनी केले.
लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या दिंडोरी रोडवरील पोकार काॅलनीतील आठवले -जोशी बालविकास मंदिर या शाळेत ९४ व्या अखिल मराठी साहित्य संमेलनानिमित्त आयोजित `ज्येष्ठ्य वैज्ञानिक व साहित्यिक जयंत नारळीकर यांची ओळख’ या प्रकल्पाच्या समारोपाप्रसंगी निपाणेकर बोलत होते.
याप्रसंगी संस्थेचे सहकार्यवाह सुधीर पाटील व शालेय समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी उपस्थित होते. मुख्याध्यापिका दर्शना मोरे यांनी प्रास्ताविक केले. २९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२१ या दरम्यान नारळीकर यांच्या विज्ञानकथा व जीवनपट यादरम्यान उलगडला गेला. संस्थेचे उपाध्यक्ष उदय शेवतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांकडून प्रश्नमंजुषा सोडवून घेण्यात आली. अश्विनी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
—