नाशिक : प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या विविध महाविद्यालयांच्या शैक्षणिक वर्ष २०१८-१९ प्रकाशित नियतकालिक स्पर्धेत विभागीय स्तर (नाशिक शहर) व्यावसायिक विभाग गटात अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशन या महाविद्यालयाच्या ‘संकल्प’ या नियतकालिकास तृतीय क्रमांक मिळाला. त्याबद्दल पुणे विद्यापीठामध्ये अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा गौरव करण्यात आला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहामध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, प्र. कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश पांडे, डॉ. विलास उगले, डॉ. संजय चाकणे आदी मान्यवरांच्या हस्ते अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. डी. एम. गुजराथी, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. स्मिता बोराडे, तसेच संकल्प नियतकालिकेच्या संपादिका प्रा. प्रिया कापडणे यांनी हा सन्मान स्वीकारला.
संकल्प या नियतकालिकाच्या निर्मिती व प्रकाशनासाठी महाविद्यालयाच्या प्रा. प्रिया कापडणे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती नेमण्यात आली होती. यात विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश करण्यात आलेला होता. संकल्प नियतकालिक २०१८-१९ हे ‘हरित भारत, स्वच्छ भारत, समृद्ध भारत’ या विषयावर आधारित होते. नियतकालिकाच्या मुखपृष्ठासाठी महाविद्यालयात दरवर्षी भित्तीपत्रक स्पर्धा आयोजन करण्यात येते. प्रथम येणारे भित्तीपत्र हे नियतकालिकाचे मुखपृष्ठ बनते.
अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने मिळवलेल्या या यशाबद्दल अशोका एज्युकेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, संचालक डॉ. डी. एम. गुजराथी, प्रशासक डॉ. तेलरांधे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. आशा ठोके, समन्वयिका डॉ. रेखा पाटील व प्रा. स्मिता बोराडे यांच्यासह सर्व प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.
—