नाशिक : प्रतिनिधी
मविप्र समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलमध्ये जागतिक एड्स निर्मूलन दिनी कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक हरिभाऊ दरेकर होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक खंडेराव वारुंगसे, पर्यवेक्षक शरद शेजवळ, संजीवनी घुमरे, मंदाकिनी पाटील उपस्थित होते.
विद्यालयातील इयत्ता १०वी `ड’च्या वर्गाने जागतिक एड्स निर्मूलन दिन कार्यक्रमाचे संयोजन केले. त्यामध्ये समृद्धी बनकर हिने एड्स निर्मूलन दिनाबद्दल माहिती सांगितली.
मुख्याध्यापक दरेकर म्हणाले की, १९८८ पासून १ डिसेंबर रोजी प्रत्येक वर्षी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने एड्स या आजारासंबंधी जागरूकता वाढवणे आणि एचआयव्हीविरुद्ध लढ्यात सहभागी होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. एड्स हा रोग ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही) द्वारे होतो. एचआयव्ही शरीरातील रोगप्रतिकारक पेशी नष्ट करतो किंवा त्याचे नुकसान करतो.
आरोही बच्छाव हिने सूत्रसंचालन केले. पुष्कर गांगुर्डे याने आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विज्ञान शिक्षक, विज्ञान छंद मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.
—
—