नाशिक : प्रतिनिधी
योग विद्या गुरुकुलतंर्गत हरी ओम योग व निसर्गोपचार केंद्र, मेरी – म्हसरूळ आयोजित निसर्गधारा कार्यशाळा उत्साहात झाली. निसर्गोपचार प्रक्रियेतील काही उपचार म्हणजे माती लेप, गार – गरम लपेट, गरम पादस्नान, कोबीची वाफ व कास्य मसाज यांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यात प्रेक्षकांनी सहभाग घेतला. मेरी कार्यालयाच्या इंजिनिअर पा. कृ. नगरकर प्रेक्षागृहात हा उपक्रम झाला. व्यासपीठावर प्रथम पंतप्रधान पुरस्कारप्राप्त योगाचार्य डॉ. विश्वासराव मंडलिक, पौर्णिमाताई मंडलिक, माजी गटनेते व नगरसेवक जगदीश पाटील, पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर कड, योगाचार्य प्रतिभा धस व योगाचार्य रमेश धस उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ओमकार प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन झाले. आर्या मंडलीक हिने गणेश वंदना नृत्य सादर केले. कार्याध्यक्ष रमेश धस यांनी प्रास्ताविक केले. निसर्गोपचारप्रमुख प्रतिभा धस यांनी योग विद्या गुरुकुल संस्थेचा परिचय करून दिला. डॉ. विश्वासराव मंडलिक यांनी निसर्गाची व्यापक व्याख्या विशद केली. ते म्हणाले की, परमेश्वराने आपल्याला शंभर वर्षे टिकेल असा मानव देह दिलेला आहे. परंतु अन्य प्राण्यांपेक्षा जास्त बुद्धी देऊनही तिचा योग्य वापर न केल्याने आपण चुकीचा आहार व विहार करत गेलो. याचा परिणाम म्हणजे विकार उत्पन्न होणे. कोणतेही दुष्परिणाम न होता विकार कमी करावयाचे असल्यास निसर्गोपचार हा एक चांगला पर्याय आहे. पौर्णिमाताई मंडलिक यांनी योग गीते सादर केली. जगदीश पाटील यांनी तारवाला नगरमधील राजमाता जिजाऊ क्रीडा संकुलात विविध खेळ प्रकारांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिली. या क्रीडा संकुलात सद्यस्थितीत चालू असलेल्या योग वर्गासोबत हरी ओम केंद्रामार्फत लवकरच निसर्गोपचार केंद्र सुरू होणार असल्याचेही सांगितले. निसर्ग रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मंगल दरेकर, मुकुंद कुलकर्णी त्यांनी पारंपारिक वेशात शंखनादाने मंडलिक दाम्पत्याचे केलेले स्वागत कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. प्रकल्प प्रमुख इंजिनिअर रणजित देशमुख यांनी केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र निकम व योग महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. निलेश वाघ यांचे स्वागत केले. निसर्गोपचाराचे प्रात्यक्षिक दाखविणाऱ्या कार्यकर्त्यांचा छोटीशी भेट देऊन सत्कार करण्यात आला. प्रकल्प सहप्रमुख कुणाल कटारिया यांनी आभार मानले. शिरीष जोशी व दिपाली जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिभा धस यांनी विश्वकल्याण प्रार्थना म्हटली.
—