नाशिक : प्रतिनिधी
शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि आरोग्य या चार गोष्टींचे संतुलन म्हणजे उत्तम आरोग्य होय. योग व संतुलित आहाराने असे उत्तम आरोग्य लाभते, असे प्रतिपादन पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ. तस्मिना शेख यांनी केले. क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या दिंडोरी येथील महाविद्यालयात क्रीडा विभागातंर्गत योगा आणि आरोग्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी डाॅ. शेख या, योग आणि फिटनेस या विषयावर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र सांगळे होते.
डाॅ. शेख यांनी पीपीटीद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच निसर्गोपचारातील साहित्यासह प्रात्यक्षिक देखील करून घेतली. डॉ. शेख यांनी भुजंगासन, धनुर्धासन, सूर्यनमस्कार, नौकासन, पवनमुक्तासन, प्राणायाम याची प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे आहे. योगामुळे मानवी प्रकृती उत्तम राहण्यास मदत होते, असे डाॅ. सांगळे यांनी सांगितले. वाणिज्य विभागप्रमुख डॉ. रूपाली शिंदे यांनी मानवी शरीर पंचतत्त्वाने तयार झालेले आहे. त्यामुळे मानवी शरीरावर निसर्गाचा परिणाम होतो, याकडे लक्ष वेधले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सुनील उगले, डॉ. अरविंद केदारे, प्रा. नीरज भाबड यांच्यासह प्राध्यापकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.
—