धम्मगिरी योग महाविद्यालयात योगशास्त्र अभ्यासक्रमांना सुरवात; विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

0

नाशिक : धम्मगिरी योग महाविद्यालयाच्या कार्यक्रमात बोलताना योगाचार्य प्रा. राज सिन्नरकर. शेजारी प्रा. राजेंद्र काळे, प्रा. तुषार विसपुते, डाॅ. सतीश वाघमारे व डाॅ. विशाल जाधव.

नाशिक : प्रतिनिधी
येथील धम्मगिरी योग महाविद्यालयात योगविषयक विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांचा शुभारंभ झाला. याप्रसंगी प्रा. राज सिन्नरकर, डाॅ. विशाल जाधव, धम्मगिरी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या सचिव डॉ. पल्लवी जाधव, प्रा. राजेंद्र काळे, प्रा. तुषार विसपुते, प्रा. चैतन्य कुलकर्णी, डॉ. सतीश वाघमारे, डाॅ. विद्या वाघमारे, प्रा. प्रिती चांदोरकर, प्रा. कल्याणी ढाकीफळे, आरती आठवले, अशोक सोनकांबळे, रमेश उन्हवणे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

योगविद्या ही परीस 
 प्रा. सिन्नरकर म्हणाले की, योगविद्या ही सनातन भारतीय संस्कृतीचा भाग आहे. योगविषयक अनेक गैरसमज समाजमनांमध्ये आहे. मात्र, महर्षी पतंजली व अनेक साधुपुरुषांनी हे गैरसमज वेळोवेळी दूर केले आहेत. योगविद्या ही भारतीय प्राचीन ऋषींनी दिलेला परीस आहे. त्याचा स्पर्श जीवनाला झाला तर जीवन समृद्ध होईल, असे प्रतिपादन प्रा. सिन्नरकर यांनी व्यक्त केले.
भारतीय संस्कृती सातत्याने पुनर्जीवित

   प्रा. सिन्नरकर म्हणाले की, संस्कृती म्हणजे मानवाचे जीवन समृद्ध करणारी विचारधारा होय. जगात 48 संस्कृती आल्या व गेल्या. भारतीय संस्कृतीवर अनेक परकीय आक्रमणे झाली. त्या काळात आपली ग्रंथालये पेटवली गेली व 95 लाखांहून अधिक अनमोल पुस्तके जळून खाक झाली. तरीही, आपले जीवन समृद्ध करणारी भारतीय संस्कृती सातत्याने पुनर्जीवित होत राहिली. सनातन भारतीय संस्कृती टिकून राहिली.

योगाने दृष्टिकोन विकसित
आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांवर आपले नियंत्रण नसते. त्याचा आपल्यावर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो. मात्र, या घटनांकडे आपण कसे बघतो, हे महत्त्वाचे आहे. म्हणजेच योग्य दृष्टिकोन हवा. योगविद्येच्या सहाय्याने हा दृष्टिकोन विकसित होऊन त्याचे चांगले परिणाम आपण अनुभवू शकतो. यातून जीवन सुंदरच आहे हे समजते, असेही प्रतिपादन प्रा. सिन्नरकर यांनी व्यक्त केले.

संवादातून शिक्षण : डाॅ. विशाल जाधव
डाॅ. विशाल जाधव म्हणाले की, योगविषयक अभ्यासक्रम आपले वैयक्तिक जीवन चांगले करतातच. शिवाय योगक्षेत्रात करिअरच्या संधीही आपल्यासाठी निर्माण करतात. आता योग अभ्यासक्रम शिकविण्यास सुरवात झाली आहे. विद्यार्थी व शिक्षकांत संवाद वाढतो तेव्हा खऱ्या अर्थाने शिक्षणास सुरुवात होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सातत्याने शिक्षकांशी सुसंवाद ठेवावा व ही योगविद्या आत्मसात करून घ्यावी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.