आमच्या संस्कृतीला, परंपरेला, सेवाभावनेला, माणुसकीला, बंधूभावनेला, कौटुंबिक जिव्हाळ्याला, आणि धनसंपदेला चैतन्य प्राप्त करुन देणारा सण म्हणजे ” दीपावली”. जीवनातील अविवेकाची काजळी साफ करुन, चैतन्याची, प्रेरणेची, ज्ञानाची, प्रकाशाची आत्मज्योत सदैव तेवत ठेवणं, हेच “दीप पूजन” .
—
आमच्यातील संस्कृतीला, परंपरेला, सेवाभावनेला, माणुसकीला, बंधू भावनेला, कौटुंबिक जिव्हाळ्याला व तेवढेच धनसंपदेला चैतन्य प्राप्त करुन देणारा सण म्हणजे “दिपावली.” अंत:करणात दडलेल्या चैतन्यमय आनंदाची अनुभूती आनंदाने घेणे, हेच ” दीप पूजन”.
आनंद हा विकत घेता येत नाही, तो साजरा करावा लागतो. तेव्हांच एक उर्जा प्राप्त होते.
“असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योऽर्माऽमृतं गमय।।”
जीवनाचा प्रवास असत्याकडून सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे, मृत्यूपासून अमरत्वाकडे व्हावा म्हणून दिव्यासारखे जीवन सतत तेवत ठेवले पाहिजे. ही शिकवण आम्हाला शालेय जीवनापासून दिली जाते. एकविसाव्या शतकात मानव भौतिक प्रगतीच्या शिखरावर जाऊन बसला. विज्ञानाच्या अविष्काराने समग्र वातावरणात विद्युत शक्तिच्या प्रकाशाने सर्वत्र झगमगाट दिसून येत आहे. मग एक छोटीशी पणती पेटवून तिला नमस्कार करण्याची गरज काय? हे म्हणणे योग्य होईल का?
तुपाचा दिवा स्वत:च्या मंदमंद जळणाऱ्या ज्योतीने माणसाला आत्मज्योतीची ओळख करुन देतो, तर विजेचा दिवा बाह्य विश्वाला लख्ख प्रकाशित करुन माणसाला अशांततेचं कारण बनवतो. तुपाचा दिवा अंधाराच्या आजूबाजूला तेजाचे वर्तुळ निर्माण करतो, तर विजेच्या दिव्यात प्रकाशाचे दर्शन होताच, डोळे दिपणार्या उजेडाचे प्रदर्शन अधिक होते. तुपाच्या दिव्याने अनेक दिवे पेटवले जातात.
“ज्योतसे ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो”
मी प्रकाशित होऊन दुसऱ्यालाही प्रकाशित करीन, ही प्रेरणा आम्हाला छोटीसी पणती देते. म्हणून ‘दिव्याला पाहून नमस्कार’.
मानवाने जगातील अंधार दूर करण्यासाठी, अज्ञान दूर करण्यासाठी व दैवी विचारांचा प्रकाश पसरविण्यासाठी सतत तेवत राहीले पाहिजे. अशी जीवन दीक्षा आम्हांला दिवा देतो.
“शुभं करोति कल्याणम्। आरोग्यं धन संपदा। शत्रु बुद्धी विनाशाय । दीपज्योती नमोऽस्तुते”।।
सूर्यास्तानंतर लावलेला नंदादीप आम्हाला मंदिराच्या गाभाऱ्यातील प्रभु दर्शन घडवतो.
बाहेर कितीही प्रकाशाचा झगमगाट असला तरी नमस्कार हा नंदादीपालाच केला जातो.
स्वत: जळून जगाला प्रकाश, शांती देणाऱ्या, तसेच दुसऱ्याला आपल्या सारखे बनवणाऱ्या दिव्या कडून जीवन दर्शन प्राप्त केले तरंच खरी दीपावली. आमच्या जीवनातील चैतन्याची, प्रेरणेची, ज्ञानाची, प्रकाशाची आत्मज्योत सदैव तेवत ठेवणे, हेच दीप पूजन होईल.
आजच्या घडीला दीपावली हा चैतन्याचा सण असला तरी वास्तवतेचं चिंतन करण्याची वेळ आलेली आहे.
अशाश्वत अशा वैभवात दीप पूजन करताना अविवेकाच्या काजळीने मात्र जीवन काळवंडत चाललंय. मानवाच्या जीवनात अविवेक हाच त्याच्या दु:खाला कारणीभूत असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
“मी अविवेकाची काजळी।फेडोनी विवेक दीप उजळी।।ते योगिया पाहे दिवाळी।। निरंतर।।
या अविवेकाची काजळी माणसाच्या मन:पटलावर जमा झाली आहे. ती काजळी फेडून मी येथे विवेकाचा नंदादीप पेटवितो. अविवेकाचा अंधार ज्यावेळी जीवनातून जाईल, त्याचवेळी विवेक दीप उजळेल. विवेकाचा दीप उजळला की सद्विचारांची वाट दिसू लागेल. त्या वाटेवरुन जाताना दिसणारा आनंद खंडीत होणारा नसेल. म्हणूनच ती दीपावली खऱ्या अर्थाने अखंडीत राहणार आहे.
मानवाला इतर प्राण्यांपेक्षा विवेक शक्ति प्राप्त झालेली असते. कोणतही कर्म करताना विवेक वाईट कामाला रोखतो. चांगल्या कर्माचा उत्साह वाढवतो.
सत्य, शांती, सौंदर्य यातून प्राप्त झालेलं ऐश्वर्य, समृद्धी, संपत्ती या सौभाग्यदायी लक्ष्मीचं पूजन करावयाचं आहे. लक्ष्मीला “श्री” म्हणजे समृद्धी, आनंद, वैभव असे मानले जाते. श्रीलक्ष्मी म्हणजे समृध्दीची देवता.
कृतज्ञता हा श्रेष्ठ गुण आहे. म्हणूनच आपण दीपावलीच्या निमित्ताने आपल्या बछड्याला कमी दूध पाजून आम्हाला दूध देणाऱ्या त्या गाय-वासराचं, जीवन ज्यावर चालतं त्या धनसंपत्तीचं, आरोग्य देवता धन्वंतरीचं पूजन करून कृतज्ञता व्यक्त करतो.
ॐ नमो भगवते वासुदेवाय धन्वन्तरये अमृतकलश हस्ताय |
सर्वामय विनाशनाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्णवे नमः ||
आज मानसिक संतुलन सांभाळत आरोग्य संभाळणे ही तारेवरची कसरत झाली आहे. देह देवाचे मंदिर होण्याऐवजी रोगाचे मंदिर होत चालले आहे. विवेकाने वागावे, मध्यम मार्गाने चालावे, शरीर आणि मन यांचे योग्य संतुलन जोपासावे हीच धन्वंतरीची पूजा.
आज काळजी, विचार, चिंता, दारिद्र्य, मृत्यु, आवाज, खेचाताणी, राजकीय अस्थिरता, अत्याचार, दुराचार, भ्रष्टाचार, कौटुंबिक कलहामुळे मन दुर्बल व शक्तीहीन होत आहे. यामुळे रक्तदाब, मधुमेह, चर्मरोग, हृदयविकार, दुर्बलता असे रोग मानवाच्या नरडीचा घोट घेत आहेत. त्यामुळे जगा आणि जगू द्या असं म्हणण्याची वेळ आली आहे. आपल्यातील विवेक जागा करुन, पैश्यांच्या मागे लागु नये, पण पैश्याकडे पाठही फिरवू नये. विद्याव्यासंग करावा पण प्रकृतीकडे लक्ष द्यावे. अन्नाची चव संभाळावी, पण त्यातील सत्व गमवू नये. मन वागेल तसे वागू नये. पण, मन मारुनही जगू नये. आमची जीवनज्योत सदैव प्रफुल्लीत ठेवणं, हेच धन्वंतरी पूजन.
आज शब्दांचा खेळ मांडत सदिच्छांचा भडीमार चाललाय. पण देण्यासाठी ती आमच्यापाशी आहे का ? आधी याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे.
शेवटी आमच्या हृदयातील ईश्वराला साक्षी ठेवून, सदिच्छेचा वर्षाव करतो. औक्षण करुन मागंल्याची, आरोग्याची, उदंड आयुष्याची कामना व्यक्त करतो. कारण तबकातील छोटीसी निरांजन एकमेकांच्या अंत:करणातील ज्योत प्रज्वलित करण्याचं काम करते. बाह्य दीवा तेवत ठेवण्यासाठी, त्याला सतत तेल, वात घालावी लागते. त्याची काळजी घ्यावी लागते. तसेच सदाचाराचं तेल आणि सद्भावनेची वात लावून अविवेकाची काजळी साफ करत आत्मज्योत प्रफुल्लीत ठेवणं हीच खरी “दिपावली” .
– अनंत भ. कुलकर्णी, बीड