सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : मानसिक ताण-तणाव    

0

मानसिक ताण-तणाव

मनाच्या अस्वस्थ अवस्थेतून मानसिक ताण-तणाव हा विकार जन्माला येतो. अलीकडच्या विज्ञान युगाची ताण-तणाव ही एक देणगीच म्हणावी लागेल. भौतिक सुखे, चंगळवाद, धावपळ, गतिमानता, प्रदूषण, बदललेली जीवनशैली, अवाजवी महत्त्वकांक्षा यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ताण-तणाव हा सर्वांनाच आहे. परंतु ज्यांनी ताण-तणावाचे व्यवस्थापन केले त्यांना हा विकार फारसा त्रासदायक नाही. परंतु ज्यांना व्यवस्थापन जमले नाही, त्यांच्यासाठी हा विकार जीवघेणा ठरला आहे. मानसशास्त्राच्या दृष्टीने मनाचे अस्तित्व मान्य करावेच लागते. मन हे जरी इंद्रिय म्हणून समजू शकत नसलो तरी मन हे योगशास्त्राच्या दृष्टीने सातवे इंद्रिय मानले आहे. त्याच्याशिवाय जाणीव किंवा ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. शरीराचे आरोग्य हे मनावर अवलंबून असते, आधुनिक वैद्यक शास्त्राच्या दृष्टीने कोणताही आजार हा Psycosomatic असू शकतो. म्हणजेच आजार हे केवळ शारीरिक किंवा मानसिक नसून बरेचसे आजार हे मनोकायिक असता. म्हणूनच शारीरिक स्वास्थ्य हे मानसिक स्वास्थ्यावर अवलंबून असते, यामुळेच योगशास्त्राने शरीराबरोबरच मनाचाही विचार सातत्याने केला आहे.

मानसिक ताण तणाव निर्माण होण्याची कारणे

चिंता, भीती, क्रोध, वैफल्य, भावनांचा असमतोल, संघर्ष, तीव्र संवेदनशीलता, बदलती सामाजिक परिस्थिती, गतिमानता, वेग, स्पर्धा, ई-माध्यमांचा बेसुमार वापर, बदलती जीवनशैली, चंगळवाद, व्यसनाधीनता, कोविडसारखे साथीचे विकार, हवामानातील चढउतार, प्रदूषण इत्यादी कारणांमुळे मानसिक ताण तणाव वाढत जातो.

लक्षणे

अस्वस्थ वाटणे, रक्तदाब वाढणे, बेचैनी, नैराश्य, दुःख, मनाची विफल अवस्था, द्विधा अवस्था, भूक न लागणे, सारखी लघवी किंवा शौचास येणे, स्नायूवरील नियंत्रण सुटणे, थरकाप होणे, शब्द न फुटणे, संधीग्ध व अस्पष्ट बोलणे, घाई व गडबड करणे, चक्कर येणे, बेशुद्ध होणे, हृदयविकाराचा झटका येणे, मधुमेह या आजाराचा जन्म होतो.

योगोपचार

सूर्यनमस्कार
आसन
प्राणायाम
क्रिया कपालभाती व मानदंड वस्त्र शंख प्रक्षालन यामध्ये मन हे शांत व स्थिर करावे.
धारणा ध्यान – प्रणव ओंकार उच्चारण करावे.
शवासन योगनिद्रा
श्वसनावर झालेला परिणाम प्राणायामाने दीर्घ श्वसनाने सुधारतो. मन शांत व स्थिर झाल्याने ते प्रसन्न होते. इतरांशी मिळून मिसळून वागल्याने आनंदी होते.यम-नियम पालन ही महत्त्वाचे आहे.

निसर्गोपचार

या उपचार पद्धतीवर विश्वास ठेवून मन सकारात्मक बनवावे. आहार हलका, पालेभाज्या, कडधान्य, रसाहार, हलाहार, आठवड्यातून एकदा उपवास, बाष्पस्नान, मसाज, टब बाथ, एनिमा शंख प्रक्षालन. पोट साफ होते. क्रियांच्या अभ्यासाने श्वसन संस्था साफ होते. आत्मविश्वास वाढतो. हलके वाटते. पर्यायाने उत्साह वाढतो. जुळवून घेण्याची वृत्ती निर्माण होते. व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होऊन मानसिक ताण तणाव कमी होतो.

वर्ज धूम्रपान, अल्कोहोल, मांस, मटन, मोबाईल व टीव्हीचा अतिवापर, विनाकारण धावपळ व असंयम वर्ज करावा.

– प्रा. डॉ. राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख
संगमनेर महाविद्यालय,संगमनेर
मेल rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर ९८२२४५०७६

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.