नाशिक : प्रतिनिधी दिवंगत गांधीवादी कार्यकर्त्या-लेखिका प्रा. वासंती सोर यांनी लिहिलेल्या ‘जाणून घेऊया गांधीजींना’ या पुस्तकाचे प्रकाशन व ‘गांधीवादी जीवनशैली’ या विषयावर मान्यवरांशी संवादाचा कार्यक्रम येथे आज (रविवार, दि. २ ऑक्टोबर) सायंकाळी ५ वाजता आयोजित केला आहे. कुलकर्णी गार्डनजवळ असलेल्या होलाराम कॉलनी रस्त्यावरील वैराज हॉल येथे होणार आहे. महात्मा गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम होत आहे. या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ्य सर्वोदयी नलिनीताई नावरेकर यांच्या हस्ते होणार आहे.
म. गांधीजींच्या सान्निध्यात बालपण गेलेल्या दिवंगत प्रा. वासंती सोर यांनी आपले सर्व जीवन महात्मा गांधीजींचे विचार, कार्य आणि तत्वांचा प्रचार प्रसारासाठी समर्पित केले होते. या विचारावर आधारित त्यांनी लहान-थोरांसाठी अनेक पुस्तके लिहिलीच, शिवाय विविध माध्यमांमधून या संदर्भात सातत्याने विपुल लेखन केले. अशा निवडक लेखांचे विचारधन ‘जाणून घेऊया गांधीजींना’ या पुस्तकातून त्यांच्या मृत्यूनंतर सोर परिवारातर्फे प्रकाशित होत आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाला जोडूनच गांधीवादी जीवनशैली संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व वर्धा येथील राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रधानाचार्य डॉ. हेमचंद्र वैदय, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद दीक्षित, ज्येष्ठ सर्वोदयी नलिनीताई नावरेकर यांच्याशी मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सोर परिवार आणि सर्वोदय परिवारातर्फे करण्यात आले आहे.
—