`निसर्गाची पाठशाळा – निसर्ग विद्या निकेतन’मध्ये निसर्गोपचार दिनाचे औचित्य साधून `योग व ॲक्युप्रेशर’ची प्रात्यक्षिके

0

नाशिक : प्रतिनिधी

`निसर्गाची पाठशाळा’ हे ब्रिदवाक्य असलेल्या व श्रीमती पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टतंर्गत चालणाऱ्या `निसर्ग विद्या निकेतन’तर्फे शुक्रवारी (दि.19) निसर्गोपचार दिनाचे औचित्य साधून योग व ॲक्युप्रेशर या विषयांचा प्रात्यक्षिक वर्ग पार पडला.

निसर्गोपचार डिप्लोमा या सहा महिने कालावधी असलेल्या अभ्यासक्रमातंर्गत हा वर्ग झाला.
याप्रसंगी संस्थेचे प्रमुख रणजित पाटील व सुनिता पाटील, प्रा. तस्मिना शेख, तसेच प्रा. राज सिन्नरकर प्रा. तुषार विसपुते व प्रा. पुरुषोत्तम सावंत उपस्थित होते.

प्रा. सिन्नरकर यांनी सद्यस्थितीत निसर्गोपचाराची गरज सांगताना `प्रत्येक घरात एक तरी निसर्गोपचार तज्ज्ञ हवाच’ असा नारा दिला. संस्थेच्यावतीने विदयार्थ्यांना टी-शर्ट, ॲप्रन, तसेच शिक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले.

योगशास्त्रात सांगितलेल्या शुध्दीक्रियांची प्रात्यक्षिके घेण्यात आली. ज्यात प्रा. राज सिन्नरकर यांनी स्वत: दंडधौती, सूत्रनेती, जलनेती यांचे प्रात्यक्षिक केले व विद्यार्थ्यांकडून करवूनसुध्दा घेतले. त्यानंतर सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांनी एकत्रित सहभोजनाचा आनंद घेतला. त्यानंतर प्रा. तस्मिना शेख यांनी ॲक्युप्रेशर या विषयाचे प्रात्यक्षिक घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वानी निसर्ग आहार म्हणजेच मोड आलेले मुग आणि डाळींब तसेच बीट, पुदीना रसाहाराचा आनंद घेतला. यू. के. अहिरे यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांच्या काही प्रतिक्रीया

वैद्यकीय जीवनात उपयोग करू

या निसर्गोपचार मार्गदर्शन शिबिरात सर्व गुरुवर्यांनी आम्हाला जे मोलाचे मार्गदर्शन केले, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आमच्या वैद्यकीय जीवनात आम्ही त्याचा निश्चितच उपयोग करू व लोकांमध्ये त्याचा प्रचार-प्रसार करू. जेणे करून लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होईल.
– डाॅ. सोपान पाटील, नगांव, धुळे

—-

निसर्गोपचाराचे वर्ग असेच छान होवोत

सर्व शिक्षकांचे मनापासून आभार व आलेल्या सर्व विदयार्थ्यांचेही खूप अभिनंदन. काल आपण सगळे भेटलो, ओळख झाली याचा खूप आनंद झाला. काल झालेले निसर्गोपचाराचे वर्ग असेच नेहमी छान होवोत.
– ज्योती पाटील, डोंबिवली

निरोगी जगण्याचा मंत्र समजला

निसर्ग विद्या निकेतन या संस्थेच्या माध्यमातून नवोदित विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांतून ह्युमॅनिटी पॉवरमध्ये मानसिक ताणतणाव दूर करण्याची क्षमता आहे व ही पाॅवर कुठल्याही ॲलोपॅथीशिवाय आपण आपल्यात निर्माण करू शकतो, हे लक्षाता आले. निरोगी जगण्याचा मंत्र म्हणजे नॅचरोपॅथी, हे शिकवण्यात आले. प्रा. राज  सिन्नरकर, प्रा. तस्मिना शेख, प्रा. तुषार विसपुते यांनी प्रॅक्टिकल हसत-खेळत घेतले. योग्य व्यवस्थापन करणारे रणजित पाटील, सुनीता पाटील याचे विशेष आभार.
–  गौरी राजोळे, नाशिक

—-

मनावर कायमचा ठसा उमटला

`निसर्ग विद्या निकेतन’च्या माध्यमातून नवोदित विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक सादरीकरणाचा कार्यक्रम मनावर कायमचा ठसा उमटवून गेला. योगाचार्य प्रा. राज सिन्नरकर, डॉ. तस्मीना शेख यांनी योग, आयुर्वेद, निसर्गोपचार, ॲक्युप्रेशर, आहारादी विषयासह शुद्धीक्रिया आदी विषय केवळ सैद्धांतिक माहिती न देता विविध उपकरणांच्या साहाय्याने शिकविल्या. त्यामुळे सर्व विद्यार्थीगण प्रभावीत झाले. संस्था चालक रणजीत पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सुनिता पाटील यांनी उपस्थितांना यौगिक आहार दिला. प्रा. तुषार विसपुते यांनी सर्वांना गणवेश, ॲक्युप्रेशर साहित्याचे किट वितरण केले. डॉ. चौरसिया यांनी कुष्मांड अवलेहाबद्दल माहिती दिली. प्रशिक्षणार्थी या उपक्रमामुळे चैतन्यशील झाले.
– यू. के. अहिरे, नाशिक 
—-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.