कुटूंबाने शांतपणे जगण्यासाठी आपल्या घरात योगतज्ज्ञ हवाच :  प्रा. राज सिन्नरकर

धम्मगिरी योग महाविद्यालयातर्फे आयोजन

0

नाशिक  : प्रतिनिधी
स्वतःसह पूर्ण कुटूंबाने शांतपणे जगण्यासाठी आपल्या घरात योगतज्ज्ञ हवाच. तो कुटूंबाची कुठल्याही प्रकारची फसवणूक टाळू शकतो. अनेक लोक बुद्धीचा वापर दुसर्‍याला त्रास देण्यासाठी करतात. त्यातून फसवणूक होते. हे आपल्याला योगशास्त्राच्या अभ्यासातून टाळता येते. यासाठी योगाचे तत्वज्ञान आपल्याला शिकावे लागेल, असे प्रतिपादन योगाचार्य व प्रेरणादायी वक्ते प्रा. राज सिन्नरकर यांनी केले.

यांची उपस्थिती
धम्मगिरी योग महाविद्यालयातर्फे झालेल्या व्याख्यानप्रसंगी प्रा. सिन्नरकर बोलत होते. प्रत्येक कुटूंबात एक तरी योगतज्ज्ञ हवाच, या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी डाॅ. विशाल जाधव, धम्मगिरी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या सचिव डाॅ. पल्लवी जाधव, प्राचार्य जगदीश मोहुर्ले, मानसशास्त्राचे अभ्यासक प्रा. तुषार विसपुते व प्रा. चैतन्य कुलकर्णी उपस्थित होते.

शुभ कार्य समजले की जीवन आनंदी
प्रा. सिन्नरकर म्हणाले की, एरवीचे पारंपारिक शिक्षण हे आपल्या उदरनिर्वाहाच्या कामासाठी असते. मात्र, योगशास्त्र जीवनाला सर्वांगीण स्पर्श करते. आपला आहार-विहार कसा असावा, कोणता अभ्यास करावा व तो कशा पद्धतीने करायचा, हे समजते. जीवन विकासासाठीचा योगशास्त्राचा अभ्यास करायचा आहे.
काही बुद्धिमान लोकांकडून होणारी फसवणूक ही शोकांतिका आहे. हे विषचक्र आहे. पण, जीवन सुंदर आहे. मनाचे सामर्थ्य वाढवायचे आहे. जीवनात समस्या येतच नाही, असे नाही. मात्र, योग तत्वज्ञानाने आपण त्यांना तोंड देऊ शकतो. आपली  कर्मयोनी आहे, भोगयोनी नाही. शुभ कार्य समजले की जीवन आनंदी होईल. कुटूंब सुखी होईल. म्हणूनच घरात योगतज्ज्ञ हवा. त्यासाठी योगाचे तत्वज्ञान शिकायचे आहे.

आनंदी जीवन जगण्याचा राजमार्गच
प्रा. सिन्नरकर पुढे म्हणाले की, योग म्हणजे सात्विक माणसाने सात्विक माणसाला जोडणे होय. त्यातून आपण दुसर्‍यांना प्रेरणा देऊ शकतो. दुसर्‍याला, समाजाला, मानवतेला बदलताना आपोआपच आपले जीवन चांगले होते. स्पर्धात्मक द्वेष, जळफळाट टळतो. मनाच्या स्वच्छतेचे काम योगाचे तत्वज्ञान करते.  योगमार्ग हा प्रसन्न, आनंदी जीवन जगण्याचा राजमार्गच आहे.

धम्मगिरी योग महाविद्यालयात प्रवेश सुरू
योगशास्त्राचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. योगशास्त्राची पदविका म्हणजे या शास्त्राचे दोन-चार शिंतोडे अंगावर उडाले आहेत. मात्र, योगशास्त्रात एम.ए. करणे म्हणजे योगगंगेत चिंब भिजणे होय. म्हणूनच धम्मगिरी योग महाविद्यालयात योगशास्त्रात एम.ए. करू या. हा जीवन बदलणारा अभ्यासक्रम आहे. आता प्रत्येक शाळा, महाविद्यालयांत योगशास्त्र शिकविले जाणार आहे. त्यामुळे योगशास्त्रात शिक्षक म्हणून करिअर करता येईल व हे करता करता योग जगता येईल. योग ही जीवनशैली आहे, असेही सिन्नरकर यांनी सांगितले.

आदर्श योगशिक्षक भारतातच घडू शकतात
डाॅ. विशाल जाधव म्हणाले की, भारत ही योगाची जननी आहे. आदर्श योगशिक्षक भारतातच घडू शकतात. यात करिअर आहे. योग हा शिकला पाहिजे व जगला पाहिजे. आजारांना दोन हात करण्यासाठी, शारीरिक व मानसिक सामर्थ्य वाढण्यासाठी योगशिक्षक होणे आवश्यक आहे. योगशिक्षक घराघरात तयार व्हावा.

जगाला आरोग्य देऊ शकतो
प्राचार्य जगदीश मोहुर्ले म्हणाले की, भारत योगाद्वारे संपूर्ण जगाला आरोग्य देऊ शकतो. योगाच्या माध्यमातून घरगुती उपायांनीही आरोग्य चांगले राखू शकतो. योगाचा प्रचार व प्रसार भविष्यात वाढणार आहे. शाळा-काॅलेजातही योगशिक्षक लागणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.