नाशिक : प्रतिनिधी
गेली 27 वर्ष सभासदांना अविरत सेवा देणाऱ्या दिंडोरीरोडवरील सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या 28 ऑगस्टला होणार आहे. येथील श्रध्दा ज्येष्ठ्य नागरिक संघाच्या अमृतकुंभ सोसायटीतील सभागृहात सकाळी 10.30 वाजता ही सभा होईल. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक चेअरमन सुभाष काकड असतील. सभासदांनी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष सुभाष काकड, उपाध्यक्ष ॲड. राजाराम लोहकरे, सचिव अरुण म्हस्के आणि संचालक मंडळाने केले आहे.
संस्थेची स्थापना 1993 साली झाली असून एकूण सभासद संख्या एक हजार आहे. वसूल भाग भांडवल 17 लाख, 43 हजार, 800 आहे. संस्थेकडे एक कोटी 31 लाख, 68 हजार रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेने चालू आर्थिक वर्षात एक कोटी 5 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेची वसुली 98 टक्के आहे. या वर्षी संस्थेला 4 लाख, 75 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना 10 टक्के लाभांश देण्याबाबत संचालक मंडळाने प्रस्ताव दिला आहे.
संस्थेला सतत अ वर्ग मिळाला आहे. संस्थेतर्फे विद्यार्थी गुणगौरव योजनेतंर्गत गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात येते. वीज ग्राहकांच्या सेवेसाठी संस्थेने मेरी येथे व वीज कंपनीचे विद्युतनगर कार्यालय येथे वीजबिल भरणा केंद्र सुरू केले आहे.
—