महाराष्ट्र राज्य ग्रंथालय चळवळीचे पितामह म्हणून ज्यांचा आवर्जून उल्लेख करावा, असे सुभाष वाचनालयाचे ग्रंथमित्र दत्ता पगार-माळी यांचे नुकतेच वयाच्या 73 व्या वर्षी अल्प आजाराने निधन झाले. ग्रंथालय चळवळ पोरकी झाली. त्यानिमित्ताने हा लेख…
—-
सदा काळजी ग्रंथ सेवक आणि ग्रंथालयांची ! सदा आवड वाढविली वाचनाची !! तयासीच ही ज्ञान प्राप्ती सदाची ! म्हणूनच विद्वान ग्रंथास वाची !! खरे ज्ञान सर्वांच सांगुनी गेले ! सुवर्णअक्षरी ग्रंथ ही सिद्ध झाले !!
या उक्ती स्वर्गीय ग्रंथमित्र दत्ता पगार सरांना तंतोतंत लागू पडतात.
महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्याकडून शाबासकी
महाराष्ट्रभर ग्रंथालय कार्यकर्ते, सेवकांना ते आदरणीय मार्गदर्शक गुरुस्थानी म्हणून परिचित होते. सरांनी राज्यातील ग्रंथालय चळवळीमध्ये अतिशय बहुमोल भूमिका निभावली आहे. ग्रंथालय व सेवकांच्या मागण्यांकरिता आयुष्यभर संघर्ष करून लढा दिला. ते खऱ्या अर्थाने ग्रंथालय सेवा, सेवक, कार्यकर्ते यासाठी चालता-बोलता ज्ञानकोश, शब्दकोश, माहितीकोश होय. सरांचा बालवयात वयाच्या तेराव्या वर्षीपासून सुभाष वाचनालयाची संबंध आला. त्याकाळी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण हे सुभाष वाचनालयात आले असता त्यांनी बाल ग्रंथपाल पगार सरांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. त्यांचा परिसस्पर्श लाभल्याने आपले संपूर्ण जीवनच ग्रंथालय चळवळीसाठी, वाचकांच्या सेवेसाठी, सेवकांना व कार्यकर्त्यांना व्यवस्थापन मार्गदर्शनासाठी, सेवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी, विद्यार्थ्यांना जीवनाची दिशा देऊन अधिकारी, ग्रंथपाल घडवण्यासाठी घालवले.
उत्कृष्ट ग्रंथपाल घडविले
सुभाष वाचनालयाच्या माध्यमातून ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग सुरू करून अनेक विद्यार्थ्यांना या कोर्सनंतर बी.लिब, एम. लिब. पदवी घेण्यास मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांचे अनेक विद्यार्थी शाळा-महाविद्यालय, सार्वजनिक ग्रंथालयांत उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून सेवा देत आहे. याचबरोबर त्यांनी ग्रंथालय संचालनालयातील अधिकारी घडविले.
दिग्गजांचे मार्गदर्शन
मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मला नाशिक जिल्हा ग्रंथालय संघाचे चळवळीतील दीग्गज मखमलाबाद सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष व नाशिक जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष स्व. ग्रंथमित्र रामचंद्र काकड सर, चांदवड वाचनालयाचे ग्रंथमित्र स्व. काका कोतवाल, सुभाष वाचनालयाचे ग्रंथमित्र गुरुवर्य स्व. पगार सर, स्व. प्रा. एन.जे. पाटील, पंचवटी वाचनालयाचे ग्रंथमित्र देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २३ वर्षांपासून मला ग्रंथालय चळवळ, व्यवस्थापनाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सहवासात ग्रंथालय चळवळीचे, सेवेचे बाळकडू मिळाले. तसेच आमचे सहकारी ग्रंथमित्र शांताराम जाधव, ग्रंथमित्र नईम खान पठाण यांचे आम्हाला सहकार्य, मार्गदर्शन लाभले.
तरूणांनाही लाजविणारा उत्साह
ग्रंथालय व सेवकांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी राज्याचे, विभागाचे व जिल्ह्याचे गोंदिया (नागपूर), वारणानगर (कोल्हापूर), दापोली (रत्नागिरी), पुणे, मुंबई तसेच नाशिक जिल्हाभर अनेक ठिकाणी ग्रंथालय अधिवेशने झाली. तसेच आजाद मैदान (मुंबई), नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, कराड सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी धरणे आंदोलनात सहभागी होता आले. अनेक ठिकाणी झालेल्या ग्रंथालयीन अधिवेशनात, कार्यक्रमात राज्यभरातील ग्रंथालयीन सेवक, कार्यकर्ते हे पगार सरांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद व मार्गदर्शन घेत असत. ग्रंथालयाचा एक प्रतिनिधी म्हणून या ऋषितुल्यबरोबर मी सहभागी होऊन प्रवासाचे, सेवेचे भाग्य मला लाभून ग्रंथालय क्षेत्रातील बाळकडू मिळाले. प्रवासादरम्यान गाडीमध्ये या ज्येष्ठांचा गप्पांचा विषय फक्त ग्रंथालयीन चळवळ आणि सेवकांचे प्रश्न आणि वाचनसंस्कृती यावर चर्चा होत असे. कधी रात्रीचा प्रवासाचा प्रसंग आल्यास पगार सर रात्रभर जागत व गप्पा मारत असत. प्रवासात ही मंडळी वयस्कर असूनही कधी थकली नाही की आजरी पडली नाही. हा उत्साह आमच्यासारख्या तरुणांनाही लाजवेल असा होता.
जिभेवर अक्षरक्ष: सरस्वती
पगार सरांना पर्यटनाची विशेष आवड असल्याने अनेक धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. पगार सर अष्टपैलू वाचक असल्याने अनेक धार्मिक, ऐतिहासिक संदर्भ अशा शेकडो ग्रंथांचे वाचन असल्याने प्रवासादरम्यान तासनतास ते आपले अनुभव विचार सांगत असत. त्यामुळे आमचा 4 ते 5 दिवसांचा प्रवास म्हणजे अविस्मरणीय मेजवानीच असे. पगार सरांच्या जिभेवर अक्षरक्ष: सरस्वती नांदत होती. त्यांच्यासारखा माहितीचा ज्ञानकोश, शब्दकोश, ग्रंथालय चळवळीचा महासागर,अफाट शब्द संग्रह असलेला अवलिया दुर्मिळच..पगार सरांचा ग्रंथालय चळवळ म्हणजे जणूकाही श्वासच. चळवळ ही त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होती.
स्वखर्चाने जाऊन मार्गदर्शन
नाशिक जिल्ह्यातील ग्रंथालये, वाचनसंस्कृती त्यांनी आयुष्यभर वाढविली..जोपासली. जिल्ह्यातील अनेक वाचनालयाची स्थापना असो की बंद पडलेली वाचनालय सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. स्व. काकड सर आणि पगार सर हे पेठ, सुरगाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर,नाशिक तालुक्यातील अनेक गावात या वयातही मोटरसायकलने स्वखर्चाने जाऊन मार्गदर्शन व नवीन ग्रंथालयाची उभारणी करत असे. ही ऋषितुल्य मंडळी ग्रंथालय चळवळीने अक्षरशः झपाटलेली बघून आम्ही अचंबित होत असे. खरंच परमेश्वराने स्व. काकड सर, स्व. काका कोतवाल, स्व.पगार सरांसारखी मंडळी पृथ्वीतलावर पाठवले ते फक्त आणि फक्त वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी.. वाढविण्यासाठी.. जोपासण्यासाठी आणि ग्रंथालय चळवळीसाठीच असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
समस्या सोडविण्यासाठी धडपड
ही मंडळी आपले आयुष्य ग्रंथालय व सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी जगली. प्रसंगी अनेक ठिकाणी आंदोलने, धरणे, आंदोलने केली. शासन दरबारी आमदार, खासदार, मंत्री महोदयांमार्फत प्रत्यक्ष भेटून ग्रंथालयांच्या समस्या सोडवणे संदर्भात निवेदने दिली.
पगारसरांना वाचनाचे महत्व कळल्याने त्यांनी वाचनालये स्थापन करण्यासाठी अनेकांना प्रोत्साहित केले. ते नेहमी म्हणत असत की, राजकीय, सहकारातील माणसे ग्रंथालय चळवळीत काम करत नाही. कारण .. चळवळीत प्रसिद्धीचं वलय कमी, तसेच ही चळवळ म्हणजे लष्कराच्या भाकरी भाजण्यासारखच आहे. शिवाय समाजात या कामाची दखल घेतली जात नसल्याने काम करताना दिसत नाही. त्यामुळे शासनही ग्रंथालय चळवळीकडे लक्ष देत नाही. हीच खरी शोकांतिका होय.
पगार सरांनी सुमारे 55 वर्ष अल्प वेतनावर अर्धपोटी राहून जिल्हाभर चळवळ चालवली, वाढवली. वयाच्या सत्तरीतही त्यांनी संगणकाचे ज्ञान घेतले होते आणि त्यावर काम करत होते. असे आधुनिक मीडिया… व्हाॅट्सॲप असो फेसबुक या माध्यमांचाही त्यांनी खुबीने वापर केला. या वयातही स्वतःचा शारीरिक, मानसिक फिटनेस राखण्यासाठी ते नियमित व्यायाम, प्राणायाम करत. त्यांच्या स्वभावातील आत्मीयता आपलेपणा चंदनासारखा शीतल प्रसन्नता, प्रोत्साहन देणारा असा होता. आमचे श्रद्धास्थान असलेले गुरुवर्य पगार सरांना माझे शतशा प्रणाम.
ग्रंथमित्र राजेश वा. शिरसाठ
– ग्रंथपाल, सार्वजनिक वाचनालय मखमलाबाद. (पंचवटी) नाशिक.०३
मो नं.९९२१३५०९५८
—