या जगात अनेक धर्म आहेत. इतके धर्म असूनही आजचे जग मानवी शांती आणि आनंदासाठी इकडे तिकडे भटकत आहे. जगात जितके मानवी समूह आहेत त्यांना बांधून ठेवण्यासाठी धर्माची निर्मिती झाली. चिंतनाद्वारे धर्माचे योग्य स्वरूप ठरवले.
“न सत्यात परमो धर्म” (सत्य हेच धर्म आहे), “अहिंसा परमो धर्म” (अहिंसा हा धर्म आहे), “आनृशस्यं परमो धर्मः” (दया धर्माचे मूळ आहे) याप्रमाणे धर्माचे काही स्वरूप संपूर्ण जगात बघायला मिळतात. प्रत्येक धर्मावर त्याच्या संस्थापकाचा प्रभाव असतो. अपौरुषिय निर्मात्यांनी निर्माण केलेली जीवनपद्धती आम्हाला मिळाली आहे. (अपौरुषिय म्हणजे सर्व आर्य ऋषींनी संकलित केलेले किंवा कंठस्थ विचार) तो विचार अशा प्रकारे “यतो अभ्युदयः निःश्रेयसः सिद्धिः सः धर्मः” (ज्यामुळे ऐहिक, दिव्य कल्याणाची प्राप्ती होते तोच धर्म) अशा प्रकारे ऐहिक आणि पारमार्थिक कल्याण या दोन गोष्टींचा एक सुंदर समन्वयाचा विचार वैदिक धर्माने केलेला आहे. संपूर्ण मानवी समाजाचे समग्र जीवन घडविण्याचे धाडस त्यात आहे. समाजाला शांती आणि सुख प्रदान करण्याची दिशा या वैदिक धर्माच्या विचारांमध्ये आहे. फक्त आजच्या युगात या विचारांना समजावून सांगण्याची दृष्टी असायला हवी. भारतीय संस्कृतीच्या समाजरचनेचा पाया अतिशय शास्त्रीय आहे.
समाज ही निसर्गाची निर्मिती आहे. निसर्गाचे नियम अदृश्य स्वरूपात त्यांचे कार्य सतत करत असतात आणि या नियमांचे दृश्य परिणाम विविध आयाम, विकास आणि घटनांद्वारे होणारे विनाश यातून आपल्याला समजते. हे नियम ऑटो रूल या तत्त्वावर काम करतात. जरी आपण भौतिक जगाचे नियम मोडले किंवा कसे तरी आपण त्यातून वाचलो, परंतु निसर्ग स्वतःच्या पद्धतीने निसर्गाचे नियम तोडण्याची शिक्षा देतो. या गोष्टी सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडच्या आहेत. ते समजून घेण्यासाठी प्रशिक्षण, संस्कार आवश्यक आहेत. प्राणी आणि मानव समूहाशिवाय जगू शकत नाहीत. दोघांमधला फरक एवढाच आहे की प्राण्याची सामाजिक रचना अंतःप्रेरणेवर (instinct) आधारित असते आणि माणसाची सामाजिक
रचना बुद्धिमतेवर (intellect) आधारित असते. बुद्धिमत्तेवर आधारित समाजरचना दोन मुख्य तत्वांवर टिकून असते, भूक म्हणजे पोट भरण्यासाठी संपत्ती, अर्थ आणि काम (कुटुंब व्यवस्था).
समाजाच्या प्राथमिक अवस्थेत ‘काम’ हा एकमेव पुरुषार्थ होता. संपूर्ण व्यवहार स्वईच्छेने होत असत. कुटुंबात पुरुषी वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यामुळे पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था आणि संस्कृती अस्तित्वात आली. काम हा मुख्य पुरुषार्थ असल्याने त्याच्यासाठी पैसा (अर्थ) आवश्यक होता. त्याकाळी केवळ पैसा म्हणजे पैसाच नव्हे तर मनुष्य, पशुधन, शेती इत्यादींचाही अर्थाअंर्तगत व्यवहार म्हणून उपयोग होत असे. ज्याच्याकडे जास्त धन-सत्ता आहे, त्याच्याकडे अधिक भोगाची उपयोगिता वाढली. त्यातच सत्तेमुळे ‘समाज रचना’ही सताधीश ठरवू लागले. ते जे काही ठरवतील, ती समाजाची निर्मिती मानली गेली. यामुळे सत्तेचे केंद्रीकरण होऊ लागले.
(पूर्वार्ध)
— खोजी पुरूषोत्तम सावंत, नाशिक
मो. नं. – 9561031792
मेल आयडी – purushottam16want@gmail.com