नाशिक : प्रतिनिधी नेट परीक्षेचा अभ्यासक्रम अथांग महासागरासारखा आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमापेक्षा अधिक सखोल अभ्यास यात आहे. मात्र, या परीक्षेत यश मिळविल्यानंतर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर प्राचीन ॠषींच्या शास्त्रांचा अभ्यास या माध्यमातून होईल. त्यामुळे आपल्यासह इतरांची जीवनशैली बदलून जीवन सकारात्मकतेने आमुलाग्र बदलेल, असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते व योगशास्त्राचे ज्येष्ठ्य अभ्यासक प्रा. राज सिन्नरकर यांनी केले.
पतंजली योग अभ्यास मंडळातर्फे योगशास्त्रात नेट परीक्षा या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सिन्नरकर म्हणाले की, या परीक्षेत आपण उत्तीर्ण झाल्याने सहायक प्राध्यापक होऊ शकतो. येत्या 2-4 वर्षांत प्रत्येक महाविद्यालयात योगशास्त्राचे प्राध्यापक असतील. सर्व परिसरांत योगकेंद्र उघडले जातील. तसेच पीएच. डी.साठी आपण या परीक्षेद्वारे पात्र ठरू शकतो.
या परीक्षेच्या अभ्यासाने योगशास्त्र जीवनात आणण्याची यापेक्षा उत्तम पद्धती नाही, असेही प्रा. सिन्नरकर यांनी सांगितले.
याप्रसंगी नेट परीक्षा कशी असते, ती उत्तीर्ण होणे का आवश्यक असते, नेट परीक्षेचे रजिस्ट्रेशन कसे करायचे, अभ्यासक्रम काय आहे?, अभ्यासवर्गाचे स्वरूप कसे असेल?, नेट परीक्षेचे फायदे काय ? याबाबत माहीती देण्यात आली.
प्रा. तुषार विसपुते यांनी सांगितले की, सोमवारपासून (दि.14) या अभ्यासवर्गास ऑनलाईन सुरूवात होईल. अभ्यासाच्या नोट्स व 10 हजार बहुपर्यायी प्रश्न तयार करून अभ्यासवर्ग सुरु करीत आहोत. हा वर्ग रोज २ तास व रविवारी बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा, अशा स्वरुपाचा असेल.
भाग्यश्री खांडवेकर यांनी नेट परीक्षेतील पेपर – एकबद्दल माहीती सांगितली.
नेट परीक्षा ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी प्रा. तुषार विसपुते 9922303303 व प्रा.चैतन्य कुलकर्णी 9623031261 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रा. चैतन्य कुलकर्णी याप्रसंगी उपस्थित होते.
—