`टीजीएफʼचे संस्थापक “सरश्री” यांचा अध्यात्मिक प्रवास त्यांच्या बालपणापासूनच सुरु झाला होता. बालपणी त्यांना अनेक प्रश्न पडायचे जसे,
कर्म हे माणसाच्या जन्माचं, दुःखाचं कारण सांगितलं जातं, मग माणसाचा पहिला जन्म कोणत्या कर्मामुळे झाला?
संसार जर स्वप्न आहे, असत्य आहे, तर वास्तव काय आहे? सत्य काय आहे? मृत्यूनंतर आपण कुठे जाणार आहोत?
ध्यान केल्याने सत्य गवसतं, की सत्य मिळाल्यानंतर माणूस ध्यानातच राहतो?
कर्म मोठं की भाग्य मोठं ?
खरा अहंकार आणि खोटा अहंकार यात फरक काय?
मोक्ष, मुक्ती, निर्वाण म्हणजे काय ?
संसाराला गुलामी बंधन म्हटलं जातं, मग स्वातंत्र्य म्हणजे काय ? या प्रश्नांच्या शोध प्रवासात त्यांनी अनेक प्रकारच्या अध्यात्मिक प्रणालीचा सविस्तर अभ्यास केला. कित्येक ध्यानपद्धती प्रत्यक्ष केल्यात. या प्रेरणेमुळे ते अंतिम सत्यापर्यंत पोहोचू शकले. या सत्य प्राप्तीची शिदोरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविता यावी, त्यासाठी पूर्ण वेळ देता यावा म्हणून ‘सरश्री’नी आपले अध्यापनाचे कार्य थांबविले.
जीवनाचे रहस्य समजण्यासाठी बराच काळ मनन करून आपले शोधकार्य सुरू ठेवले. ‘आत्मबोध’ झाल्यानंतर त्यांना जाणवले की सत्यापर्यंत पोहोचण्याच्या मार्गात एकच सुटलेली कडी (मिसिंग लिंक) आहे आणि ती म्हणजे समज (अंडरस्टॅडिंग ) सत्यप्राप्तीचा सर्व मार्गाचा आरंभ विविध प्रकारे होतो, परंतु शेवट मात्र ‘समजे’ने होतो, हा विचार सरश्रींनी तेजज्ञान फाउंडेशनच्या मध्यवर्ती उद्दिष्टात समाविष्ट केला आणि ‘हॅपी थॉट्स’ हे टीजीएफ चे ध्येय झाले.
सरश्री आपल्या प्रबोधनात्मक विचारांचा दाखला देताना नेहमी सांगतात की, “आनंद आहे! आनंदाचे कारण आहे! आनंदाचा उपाय आहे! आनंद प्राप्तीचे मार्ग आहेत!” सर्वसाधारणपणे आपण दुसऱ्यांनाच दोष देत असतो जसे त्यांच्यामुळे हे झाले, त्यांच्यामुळे ते झाले. दोष दुसऱ्यावर न टाकता सरश्री सांगतात की, ‘दोष दुसऱ्यात आहे, ह्या वाक्यताच दोष आहे.’
विश्वातला प्रत्येक माणूस, मग तो कोणत्याही जाती धर्माचा, संप्रदायाचा असो, अंतिम समज म्हणजेच ‘तेजज्ञान’ प्राप्त करू शकतो. ‘तेजज्ञानʼ या शब्दाचा नेमका अर्थ काय? हा प्रश्न कुणालाही पडू शकतो. कारण, आपण ‘ज्ञान’ व ‘अज्ञान’ हे शब्द ऐकलेले असतात. ‘तेजज्ञान’ हे एका विशिष्ट धर्माशी संबंधित नसून ते विश्वातील अखिल मानव जातीसाठीचे ज्ञान आहे. ज्ञान व अज्ञान या दोहोंच्या पलीकडे जे आहे ते आहे, तेजज्ञान’. तेजज्ञान हा सर्व धर्माना जोडणारा धागा आहे.
सरश्री नेहमी सांगतात की, विश्वाला नव्या धर्माची आवश्यकता नसून नवीन धाग्याची गरज आहे. जो सर्व धर्मांना जोडेल आणि तो धागा आहे ‘तेज’, ‘तेजज्ञान’. यालाच अनुसरून सर्व धर्माला जोडणारा मानवता मंदिराचे निर्माण कार्य ‘मनन आश्रम’ पुणे, सिंहगड रोड, नांदोशी गाव, सणसवाडी येथील निसर्गरम्य परिसरात सुरू झालेले आहे. या प्रवासात प्रत्येकाने आपला सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. (उत्तरार्ध)
— खोजी पुरूषोत्तम सावंत, नाशिक
मो. नं. – 9561031792
मेल आयडी – purushottam16want@gmail.com
–