जोपर्यंत एक जरी भरकटलेला साधक-बंधु मागे राहिला आहे, असे मला माहित असेल, तोपर्यंत मी पुनः पुनः येईन! आवश्यक असल्यास लक्षावधी नाही अब्जावधी वेळा, त्याच्यासाठी मी पुनः पुनः येईन
श्री श्री परमहंस योगानंद यांनी ‘सॉन्ग्ज ऑफ द सोल’ या त्यांच्या अभिजात आध्यात्मिक काव्यसंग्रहांपैकी एकामध्ये दिलेले हे वचन म्हणजे त्यांच्या मुखातून जणुं ईश्वरच बोलत होता. त्यांच्या दिव्य प्रतिभेचा सर्वोच्च आविष्कार आहे “योगी कथामृत” (ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी) हे त्यांचे अलौकिक आत्मचरित्र, ज्याने प्राचीन भारतीय योगशास्त्रामध्ये समग्र जगाला पुनः रुची वाटण्यामध्ये अग्रदूताचे काम केले आहे. “पश्चिमेतील योगाचे जनक” म्हणून ओळखले जाणारे योगानंदजी म्हणजे पूर्वाश्रमीचे मुकुंद लाल घोष यांचा जन्म 5 जानेवारी (1893) रोजी गोरखपूर येथे झाला.
योगानंदजींच्या आईवडिलांना वरील कवितेतील गर्भित अर्थाची पूर्वकल्पना होती. भगवती चरण घोष (बंगाल नागपूर रेल्वेचे उच्चपदस्थ अधिकारी) आणि ज्ञान प्रभा घोष (‘हृदयाची राणी’) यांनी आपल्या अपूर्व बालकाला बनारसच्या योगावतार लाहिरी महाशयाकडे नेले होते. त्या महान योगींनी बाळाला आपल्या मांडीवर बसवले आणि त्याच्या कपाळावर हात ठेवून त्याला आध्यात्मिक दीक्षा देताना वडिलांच्या व्यावसायिक भाषेतील एक विलक्षण उपमा वापरून एक पवित्र भविष्यवाणी केली, “छोटी आई, तुझा मुलगा योगी होईल. एक आध्यात्मिक इंजिन म्हणून तो अनेक आत्म्यांना ईश्वराच्या राज्यात घेऊन जाईल.”
केवळ ईश्वराची अनुभूती ही तरुण मुकुंदाच्या हृदयातील सर्वात मोठी आकांक्षा होती. ती पूर्ण करतील अशा एका गुरुंच्या शोधात त्याने दैवी उत्कटतेने अनेक महात्म्यांची भेट घेतली. आणि शिष्य जसा आपल्या गुरुंचा उत्कटतेने शोध घेत होता, तसेच गुरूही त्यांच्या शिष्याची वाट पाहत होते. अनेक वर्षांपूर्वी एका कुंभमेळ्यात त्यांच्या अजरामर गुरुंनी, म्हणजे महावतार बाबाजींनी, त्यांना असा शिष्य मिळेल असे वर्तवले होते.
शेवटी जेव्हा एका शुभ क्षणी मुकुंद श्री युक्तेश्वर गिरिंच्या चुंबकीय परिघात ओढला गेला, तेव्हा सामान्यतः निर्विकार असणाऱ्या त्या ज्ञानावतारांनी आपला आनंद बंगाली भाषेत मुक्तपणे पुनः पुनः व्यक्त केला; “अरे माझ्या राजसा, आलास माझ्याकडे!.… किती वर्षे मी तुझी वाट पाहत आहे!”
त्यानंतरचे एक दशक गुरुदेवांच्या हाताखाली कठोर प्रशिक्षण घेण्यात गेले. नंतर मुकुंदाने ज्याची दीर्घकाळ अभिलाषा धरली होती आणि ज्यासाठी कठोर परिश्रम केले होते, ती संन्यास दीक्षा त्याला प्रदान केली गेली. त्यानंतर तो योगानंद म्हणून ओळखला जाऊ लागला. योगानंद म्हणजे योगाद्वारे, दैवी मिलनाद्वारे आनंद.
योगानंदजींच्या हृदयात युवकांच्या सर्वांगीण विकासाचा आदर्श सतत वास करत असल्याने, त्यांनी 1917 मध्ये दिहिका येथे सात विद्यार्थी असलेली मुलांची शाळा स्थापन केली. एका वर्षानंतर रांची येथील कासीमबाजार पॅलेस हे या शुभ शैक्षणिक उपक्रमाचे ठिकाण बनले. ही योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (वायएसएस) ची सुरुवात होती, जीचा प्रमुख आदर्श आहे – “आपला बृहद् आत्मा (परमात्मा) म्हणून मानवजातीची सेवा करणे.” शंभराहून अधिक वर्षांनंतर, काळाच्या चढउतारांचा कोणताही परिणाम न होता, ही संघटना मजबूत आहे आणि देशाच्या जवळपास सर्व भागांमध्ये तीचे आश्रम आणि ध्यान केंद्रे आहेत.
1920 मध्ये योगानंदजींना ‘इंटरनॅशनल कॉंग्रेस ऑफ रिलिजस लिबरल्स’ मध्ये भारतातून प्रतिनिधी म्हणून आमंत्रित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी लॉस एंजेलिस येथे मुख्यालय असलेल्या सेल्फ-रिलायझेशन फेलोशिप (एसआरएफ) ची स्थापना केली.
त्यांच्या शिकवणीच्या केंद्रस्थानी ध्यान तंत्रांची एक शक्तिशाली प्रणाली आहे – ध्यानाचे क्रियायोग विज्ञान. भगवद्गीतेमध्ये नमूद केलेले आत्म्याचे हे प्राचीन विज्ञान, स्वप्रयत्न आणि दैवी कृपा यांच्या माध्यमातून उच्च आध्यात्मिक जाणीव जागृत करण्यासाठी शक्तिशाली पद्धती प्रदान करते. या विज्ञानाचा भावपूर्ण उपयोग योगानंदजींच्या खऱ्या जीवनाच्या आदर्शाला प्रतिध्वनित करतो: “जीवनाच्या रणांगणावर प्रत्येकाला आणि प्रत्येक परिस्थितीला वीराच्या धैर्याने आणि विजेत्याच्या स्मितहास्याने भेटा.”
अधिक माहिती: yssofindia.org
लेखिका : संध्या एस. नायर