शंभराहून अधिक वर्षांचा वारसा असलेल्या, योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (वायएसएस) या भारतातील एका प्रमुख आध्यात्मिक संस्थेची स्थापना, ‘योगी कथामृत’ या मोठ्या प्रमाणावर नावाजलेल्या पुस्तकाचे लेखक, श्री श्री परमहंस योगानंद यांनी 22 मार्च 1917 रोजी केली. वायएसएस ने भारताची आध्यात्मिक शिकवण सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात आणि सत्याच्या शोधकांना ईश्वराबरोबरचे त्यांचे नाते अधिक घट्ट व्हावे म्हणून सक्षम करण्यातच नव्हे, तर भारतभरातील अनेक धर्मादाय प्रकल्प आणि उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष योगदान देण्यातही एक अग्रगण्य आणि प्रशंसनीय भूमिका बजावली आहे.
योगानंदजी जेव्हा एक तरुण संन्यासी होते, तेव्हा त्यांनी ज्याला ते ‘योगदा’ म्हणत त्या शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधत सुसंवादीपणे जगण्याच्या पद्धतीचे प्रशिक्षण तरुणांना देण्याचे अफाट कार्य हाती घेतले. त्यांनी 1917 मध्ये मूठभर विद्यार्थ्यांसह सध्याच्या पश्चिम बंगालमधील दिहिका येथे एक शाळा सुरू केली. असे कार्य करीत असताना भविष्यातील एका अत्यंत प्रभावशाली आध्यात्मिक संस्थेचे म्हणजे वायएसएसचे ते बीजारोपण करीत होते. 1920 मध्ये अमेरिकेत आल्यानंतर योगानंदजींनी सेल्फ-रिअलाइझेशन फेलोशिप ही वायएसएसची भगिनी संघटना स्थापन केली. एसआरएफची ध्यानकेंद्रे जगभरात आहेत आणि वायएसएस प्रमाणेच ही संस्थासुद्धा प्रशंसनीय आध्यात्मिक भूमिका बजावत आहेत. वायएसएस आणि एसआरएफ चे सध्याचे अध्यक्ष आहेत स्वामी चिदानंद गिरी.
योगानंदजींचे गुरू स्वामी श्री युक्तेश्वर गिरी यांच्या आग्रहावरून वायएसएसची सुरुवात करण्यात आली; ज्यांनी त्यांना क्रिया योगाच्या मुक्तिप्रदायक शिकवणींचा प्रसार करण्यासाठी एक संस्था सुरू करण्याचा सल्ला दिला होता. जी प्रामाणिक सत्याच्या साधकांना ईश्वराला जाणून घेण्याचा मार्ग शोधण्यास सक्षम करेल आणि मार्गदर्शन करेल. संघटना म्हणजे “गांधीलमाश्यांचे पोळे”, हे माहीत असल्यामुळे, तरुण योगानंदजी संघटना स्थापन करण्यास सुरुवातीला अनुत्सुक होते. परंतु अखेरीस त्यांनी आपल्या गुरूंच्या निर्देशांचे पालन केले आणि अशाप्रकारे सुरू झालेली एक आध्यात्मिक लहर अखेरीस सर्व राष्ट्रांच्या समुद्रतटांवर पोहोचणारी एक शक्तिशाली लाट बनली.
वायएसएस ची उद्दिष्टे आणि आदर्श मुळातच विस्तृत आणि प्रेरणादायी आहेत आणि त्यापैकी एकाची सुरुवात खालील शब्दांनी होते:
“ईश्वराचा प्रत्यक्ष वैयक्तिक अनुभव मिळविण्यासाठी निश्चित वैज्ञानिक तंत्रांचे ज्ञान राष्ट्रांमध्ये पसरवणे.”
योगानंदजींनी त्यांच्या गुरूपरंपरेतून आत्मसात केलेले क्रिया योगाचे विज्ञान हा त्यांनी प्रतिपादित केलेल्या शिकवणीचा केन्द्रबिंदू आहे आणि त्याभोवतीच ते फिरते. संपूर्ण भारताच्या नकाशावर ठिपक्यांप्रमाणे पसरलेली शेकडो वायएसएसची ध्यान केंद्रे भक्तांसाठी दीपस्तंभाचे काम करतात.
रांची, दक्षिणेश्वर, द्वारहाट आणि नोएडा येथे असलेल्या वायएसएसच्या आश्रमात अनेक संन्यासी आणि स्वयंसेवक राहतात आणि महान गुरूंच्या कार्याचे प्रतिनिधी म्हणून आपली सेवा देण्यासाठी ते वायएसएसच्या कामकाजाचे व्यवस्थापन बघतात. आध्यात्मिक उपक्रम पार पाडतात. सत्संग करतात. साधकांना सल्ला देतात. घरी शिकण्याची पाठमाला आणि साहित्य यांचे वाटप करतात. आवश्यकतेनुसार मदत कार्याचे आयोजन करतात आणि योगानंदजींच्या शिकवणीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी इतर अनेक उपक्रम करतात.
वायएसएस द्वारे गुरूंचा जन्मदिवस आणि महासमाधी आणि इतर स्मृतीदिनांच्या प्रसंगी विशेष ऑनलाइन आणि ऑफलाइन सत्संग आयोजित केले जातात. साधकांचे संगम (मेळावे) देखील नियमितपणे होतात. या कार्यक्रमांमुळे उपस्थित भाविकांची तळमळ, भक्ती आणि आकलन वाढण्यास मदत होते.
2017 मध्ये वायएसएस ला 100 वर्षे पूर्ण झाली तेव्हा आणि 2018 मध्ये योगानंदजींच्या 125 व्या जयंतीच्या प्रसंगी भारत सरकार (GOI) द्वारे वायएसएसचा सन्मान करण्यात आला. योगानंदजींच्या जीवनाचा आणि कार्याचा गौरव करण्यासाठी भारत सरकारने 1977 मध्ये एक आणि 2017 मध्ये दुसरे अशी पोस्टाची 2 तिकिटे प्रकाशित केली.
परमहंस योगानंदजींची शिकवण भारतभरातील हजारो साधकांना मंत्रमुग्ध करीत आहे आणि प्रेरणा देते आहे आणि त्यांच्या वारशाचे वायएसएस हे सत्त्व आहे. वायएसएस आणि एसआरएफ च्या माध्यमातून योगानंदजी आजही जिवंत आहेत आणि त्यांचा स्मृतिसुगंध अजूनही ताजा आहे. अधिक माहितीसाठी: yssi.org
—